कर्नाटकात भाजपचे मिशन 'कमळ'; कॉंग्रेस-जेडीएसचे ११ आमदार राजीनाम्याच्या तयारीत


वेब टीम : बेंगळुरू
कर्नाटकात राजकीय भूकंप होणार असून कुमारस्वामी सरकार अडचणीत येणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे. कॉंग्रेसचे ८ तर जेडीएसचे ३ आमदार राजीनामा देण्याच्या तयारीत असल्याचे बोलले जात असून, या ११ आमदारांनी राजीनामे दिल्यास सरकार अल्पमतात येईल, असा दावा केला जात आहे.

मागच्या वर्षी झालेल्या कर्नाटक विधानसभेच्या निवडणुकीत भाजपाने १०४ जागा मिळवल्या. मात्र, सर्वात मोठा पक्ष ठरूनही भाजपाला सत्ता काबीज करता आली नाही. कॉंग्रेस आणि जेडीएस एकत्र येवून त्यांनी भाजपला सत्तेपासून दूर ठेवले. जेडीएसचे कुमारस्वामी हे मुख्यमंत्रीपदावर विराजमान झाले. मात्र, आता सत्तेतल्या दोन पक्षांमधलेच ११ आमदार राजीनाम्याच्या तयारीत असल्याची चर्चा सुरू झाली आहे. त्यामुळे कॉंग्रेस-जेडीएस हे दोन्ही पक्ष अडचणीत सापडले असून, सरकारही डळमळीत होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

दरम्यान कोणीही राजीनामा देणार नाही. मी कॉंग्रेस आणि जेडीएसच्या सगळ्या आमदारांशी चर्चा करणार आहे असे कर्नाटकचे मंत्री डी. के. शिवकुमार यांनी म्हटले आहे. मात्र, आम्ही राजीनामा देत आहोत. आमच्याकडे सातत्याने दुर्लक्ष होत आहे. याबाबत कुणालाही दोष देणार नाही, असे आमदार रामलिंगा रेड्डी यांनी म्हटले आहे. या घडामोडींच्या पार्श्‍वभूमीवर जेडीएस आणि कॉंग्रेस नेत्यांनी तातडीची बैठक बोलावल्याचेही सांगितले जात आहे. त्यामुळे संपूर्ण देशाचे लक्ष कर्नाटकच्या राजकीय घडामोडींकडे लागले आहे.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post