मोदींनी दिला इशारा, भाजपच्या 'या' आमदारावर होणार कारवाई


वेब टीम : दिल्ली
कोणाचाही मनमानी कारभार आणि गैरवर्तवणूक खपवून घेतली जाणार नाही. पक्षाची बदनामी करणारे कृत्य कोणीही केलेले असो, तो कोणाचा मुलगा असो, अशा कार्यकर्त्यांना पक्षातून काढून टाकले पाहिजे, अशी सक्त ताकीद पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी भाजपच्या संसदीय पक्षाच्या बैठकीत दिली.
भाजपचे ज्येष्ठ नेते आणि सरचिटणीस कैलाश विजयवर्गीय यांचे पुत्र आणि मध्य प्रदेशचे आमदार आकाश विजयवर्गीय यांनी महापालिका अधिकाऱ्यांना बॅटने मारहाण केली होती. आकाश यांना अटक झाली होती. रविवारी त्यांची जामिनावर सुटकाही करण्यात आली. आकाश तुरुंगातून बाहेर येताच त्यांचे भाजपच्या कार्यकर्त्यांनी जंगी स्वागत केले होते. या घटनेची पंतप्रधान मोदी यांनी गंभीर दखल घेतली. मंगळवारी झालेल्या संसदीय पक्षाच्या बैठकीत मोदींनी आकाश यांचे नाव घेतले नाही, पण सत्तेचा गैरवापर करणाऱ्या पक्षाचे नेते-कार्यकर्त्यांना सज्जड इशारा दिला. भाजपमध्ये एखादा व्यक्ती कितीही मोठय़ा पदावर असली वा ती कोणाचा मुलगा असली तरी पक्षाची बदनामी सहन केली जाणार नाही. अशा व्यक्तींना पक्षाबाहेरचा रस्ता दाखवला जाईल, अशी मोदींनी स्पष्ट भूमिका घेतल्याची माहिती खासदार राजीव प्रताप रुडी यांनी पत्रकारांना दिली. भाजपमध्ये गैरवर्तवणुकीला जागा नसल्याचा संदेश मोदींनी दिला असल्याचे रुडी यांनी सांगितले.
इंदूरमध्ये अनधिकृत बांधकाम पाडण्यासाठी आलेल्या महापालिका अधिकाऱ्यांना आमदार आकाश विजयवर्गीय यांनी मारहाण केली. त्या कृत्याचे समर्थन करताना, महिलांशी या अधिकाऱ्यांची वागणूक योग्य नसल्याचे कारण दिले होते. आकाश अजून राजकीय नेता म्हणून अपरिपक्व असल्याचे सांगत कैलास विजयवर्गीय यांनी मुलाला अप्रत्यक्षपणे पाठीशी घातले होते.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post
DNALive24 Marathi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates