....असा करा स्वाईन फ्ल्यूचा मुकाबला!


वेब टीम 
सध्या राज्यात काही भागात स्वाईन फ्ल्यूमुळे काही रुग्ण दगावल्याचे समोर आले आहे. स्वाईन फ्ल्यू हा आजार संसर्गजन्य आहे. त्यामुळे या आजारापासून वाचण्यासाठी सर्वांनी योग्य ती खबरदारी घेतली पाहिजे. आपण सुरक्षित असू तर आपल्या भोवतीचे आरोग्य पर्यावरण आपोआप जपले जाईल. त्यामुळेच या आजाराला न घाबरता खबरदारी हाच उपाय हे आपण ध्यानी घेतले पाहिजे तसेच या आजाराची काही लक्षणे आढळली तर लगेच डॉक्टरांकडून औषधोपचार करुन घेतले पाहिजे.

स्वाईन फ्ल्यू हा आजार नेमका कसा होतो, त्याची लक्षणे कोणती आणि त्याच्यापासून बचावासाठी काय केले पाहिजे, याची माहिती प्रत्येकाने ठेवली पाहिजे.

स्वाईन फ्ल्यू हा आजार इन्फ्लूएंजा ए एच 1 एन 1 या विषाणूपासून होतो. आजारी व्यक्तीच्या शिंकण्यामुळे आणि खोकल्यामुळे उडणाऱ्या थेंबामुळे हा आजार हवेतून इतरत्र पसरतो. सर्वसाधारणपणे या आजाराचे स्वरुप सौम्य असते. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांनी या आजाराला न घाबरता हा आजार पसरू नये म्हणून खबरदारी घेतली पाहिजे.

स्वाईन फ्ल्यू प्रतिबंध आणि नियंत्रणासाठी नागरिकांनी स्वत:हून काळजी घेतली पाहिजे. कोणताही आजार वाढू नये आणि त्याचा संसर्ग इतरांना होऊ नये, यासाठी वेळेवर उपचार सुरु करणे अत्यावश्यक आहेत. त्याचे साधारणता तीन प्रकारे वर्गीकरण केले जाते.

वास्तविक सौम्य ताप असेल तसेच खोकला, घशाला खवखव होत असेल, डोकेदुखी, जुलाब आणि उलट्याचा त्रास होत असेल तरी स्वॅब अर्थात थुंकीचा नमुना घेऊन तो प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवावयाची गरज नाही. मात्र, या रुग्णांचा जनसंपर्क कमी करावा, तसेच घरातील इतर व्यक्तींशी जास्त संपर्क टाळावा. अशा रुग्णांवर त्यांच्या लक्षणानुसार उपचार करणे गरजेचे आहे.

मात्र, या लक्षणांसोबतच तीव्र घसादुखीचा त्रास होत असेल, घशाला सूज आली असेल आणि ताप 38 डिग्री सेल्सिअस पेक्षा जास्त असेल तर अशा अतिजोखमीच्या रुग्णांचा (गरोदर माता, उच्चरक्तदाब, मधुमेह, किडनीचे विकार, कर्करोग, दमा असे विकार असणाऱ्या व्यक्ती) स्वॅब घेऊन त्याची तपासणी आवश्यक आहे. त्यांना डॉक्टरी सल्ल्यानुसार ऑसेलटॅमीवीर गोळी सुरु करावी. घरात त्यांना इतर सदस्यांपासून दूर ठेवावे आणि अँटीबायोटीक्सचा वापर करण्यात यावा.

उपरोक्त लक्षणांसोबतच धाप लागणे, छातीत दुखणे, खोकल्यावाटे रक्त पडणे, रक्तदाब कमी होणे, नखे निळसर काळी पडणे, मुलांच्यामध्ये चिडचीड आणि झोपाळूपणा वाढणे अशी लक्षणे आढळून आल्यास अशा रुग्णांचा तातडीने स्वॅब घेऊन संबंधित रुग्णास रुग्णालयात भरती करणे आवश्यक आहे. त्यांना ऑसेलटॅमीवीर गोळीची मात्रा सुरु करावी.

अर्थात, रुग्णांमध्ये ही लक्षणे आढळली तरी डॉक्टरी सल्ल्यानुसार उपचार तातडीने सुरु झाल्यावर रुग्णाच्या निकट सहवासात असणाऱ्या व्यक्तीने घाबरण्याचे कारण नाही.  रुग्णाच्या सहवासात आल्यामुळे फ्ल्यूसारखी लक्षणे आढळून आल्यास तात्काळ डॉक्टरांच्या सल्ल्याने औषधोपचार घ्यावेत.

इन्फ्ल्यूएंझा टाळण्यासाठी आपण बाहेरुन घरी आल्यानंतर साबण आणि स्वच्छ पाण्याने हात धुतले पाहिजे. जेवणामध्ये पौष्टीक आहार घेतला पाहिजे. लिंबू, आवळा, मोसंबी, संत्री, हिरव्या पालेभाज्या अशा आरोग्यदायी घटकांचा समावेश आपल्या आहारात असला पाहिजे. पुरेशी विश्रांती आणि झोपही आपल्या सुदृढ आरोग्यासाठी आवश्यक आहे. दिवसभरात भरपूर पाणी पिणे गरजेचे आहे. आपण घरात अथवा बाहेर कोठेही असो, शिंकताना, खोकताना नाक आणि तोंडावर रुमाल धरावा. शरीरात ताप  असेल, कणकण येत असेल तर लगेच डॉक्टरांचा सल्ला घ्या. डॉक्टरांच्या सल्ल्याने योग्य ते उपचार विनाविलंब सुरु करता येतील. फ्ल्यूवरील उपचार 48 तासांच्या आत सुरु झाल्यास ते अधिक गुणकारी ठरतात. फ्ल्यू प्रतिबंधक लस घेतल्याने संभाव्य धोका टळतो. विशेषता गरोदर माता, मधुमेह, अथवा उच्च रक्तदाब असणाऱ्या व्यक्ती आणि स्थूल व्यक्ती यांनी ही लस घेणे आवश्यक आहे. या शिवाय, जुनाट गंभीर आजार असणाऱ्या व्यक्तींनीही ही लस आपल्या डॉक्टरांच्या सल्ल्याने घ्यावी.

खरेतर प्रत्येक व्यक्तीने सार्वजनिक ठिकाणी अथवा घरी असतानाही काही काळजी घेणे आवश्यक आहे. सार्वजनिक ठिकाणी थूंकू नका. फ्ल्यूची लक्षणे असतील तर इतरांशी हस्तांदोलन करु नका तसेच सार्वजनिक ठिकाणी, गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळावे. औषधांचा कोर्स डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार पूर्ण करावा, तो अर्धवट सोडू नये.

बहुतांश फ्ल्यू रुग्ण हे सौम्य स्वरुपाचे असतात. त्यांना रुग्णालयात भरती करण्याची आवश्यकता पडत नाही. त्यामुळे अशा रुग्णांची घरीच चांगली काळजी घेतली पाहिजे.  घर मोठे असेल तर रुग्णासाठी वेगळी खोली निश्चित करावी. रुग्णाने स्वताच्या नाकावर रुमाल बांधावा, घरात इतर कोणी अतिजोखमीचे व्यक्ती असतील तर त्यांच्याजवळ जाणे रुग्णाने टाळावे. रुग्णाने वापरलेले टिश्यू पेपर अथवा मास्क इतरत्र टाकू नयेत.  त्याने वापरलेले रुमाल गरम पाण्यात अर्धा तास भिजवून नंतर स्वच्छ धुवावेत.  रुग्णाने भरपूर विश्रांती घेणे आवश्यक आहे.  धुम्रपान करु नये. डॉक्टरांच्या सल्ल्यानेच औषधे घ्यावीत. दिवसातून किमान दोन वेळा गरम पाण्यात मीठ हळद टाकून गुळण्या कराव्यात तसेच गरम पाण्यात निलगीरी तेल किंवा मेंथटल टाकून त्याची वाफ घ्यावी.

प्रत्येक आजाराच्या बाबतीत रुग्णाने स्वताची काळजी घेणे हे महत्वाचे आहे. सध्याच्या वातावरणात स्वाईन फ्ल्यूचा प्रसार जास्त होऊ नये, यासाठी वेळेवर उपचार आणि योग्य प्रतिबंधक उपाययोजना करणे अत्यावश्यक आहे.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post