बस कंडक्टरचा मुलगा भारतीय क्रिकेट संघात


वेब टीम : मुंबई
भारतात क्रिकेट खेळणाऱ्या प्रत्येक मुलाचं राष्ट्रीय संघात खेळण्याचं स्वप्न असतं. देशात क्रिकेट खेळणाऱ्यांची संख्या बघता हे स्वप्न पूर्ण करणे संघर्षमय असतं.

प्रतिकूल परिस्थितीमुळे अनेक जणांचं स्वप्न अधुरंचं राहतं. मुंबईतला अथर्व अंकोळेकर मात्र याला अपवाद ठरला आहे. वडिलांचं छत्र हरपलेलं, एकट्या आईने ओढलेला संसाराचा गाडा अशा परिस्थितीतही भरपूर मेहनतीच्या जोरावर अथर्वने भारताच्या १९ वर्षांखालील संघात स्थान मिळवले आहे.

श्रीलंकेत होणाऱ्या युवा आशिया करंडकासाठी डावखुरा फिरकीपटू अथर्व भारतीय संघातून खेळेल. ‘अथर्वचे वडील विनोद बेस्टमध्ये कंडक्टर म्हणून कार्यरत होते, २०१०मध्ये अथर्व अवघ्या दहा वर्षांचा असताना त्यांचे निधन झाले.

घरातला एकमेव कमवता माणुस गेल्याने मी हतबल झाले होते. एका मैत्रिणीच्या मदतीने मी घरगुती क्लासेस घ्यायला सुरुवात केली. नशिबाने मला पतीच्या जागी बेस्टमध्ये नोकरी मिळाली. बेस्टमुळेच मी माझ्या मुलाचं स्वप्न पूर्ण करु शकले.

आज सकाळपासून नातेवाइकांसोबतच बेस्टमधल्या सहकाऱ्यांचे व अधिकाऱ्यांचेही अभिनंदनाचे फोन येत आहेत. हा माझ्यासाठी अभिमानाचा क्षण आहे.’ अशा भावना अथर्वची आई वैदेही यांनी व्यक्त केल्या.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post