गणेशोत्सव शांततेत व उत्साहात साजरा करण्यासाठी नियोजन करण्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश


वेब टीम : मुंबई
गणेशोत्सवाचे स्वरूप हे उत्साही राहिले पाहिजे. त्यामुळे गणेशोत्सव शांततेत व उत्साहात साजरा व्हावा यासाठी सर्वांनी एकत्र येऊन प्रयत्न करावेत. तसेच कायदा सुरक्षेच्या दृष्टीने योग्य ते नियोजन करण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे केले.

सार्वजनिक गणेशोत्सव काळात राज्यातील कायदा आणि सुव्यवस्थेसंदर्भात मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली आज सह्याद्री अतिथीगृहात बैठक झाली.

यावेळी उच्च व तंत्रशिक्षणमंत्री विनोद तावडे, शालेय शिक्षणमंत्री  ॲड. आशिष शेलार, गृहराज्यमंत्री डॉ. रणजित पाटील, राज्यमंत्री संजय ऊर्फ बाळा भेगडे, आमदार मंगलप्रभात लोढा, मुंबईचे महापौर विश्वनाथ महाडेश्वर, पुण्याच्या महापौर मुक्ता टिळक, अपर मुख्य सचिव संजय कुमार, पोलीस महासंचालक सुबोध जायसवाल, मुंबई पोलीस आयुक्त संजय बर्वे, यांच्यासह वरिष्ठ पोलीस अधिकारी, बृहन्मुंबई सार्वजनिक गणेशोत्सव समन्वय समितीचे अध्यक्ष ॲड. नरेंद्र दहीबावकर, कार्याध्यक्ष कुंदन आगासकर, प्रमुख कार्यवाह गिरीश वालावलकर, अखिल भारतीय गणेशोत्सव महासंघाचे अध्यक्ष जयराज साळगावकर, सरकार्यवाह संजय सरनौबत आदी उपस्थित आहेत.

समन्वय समितीच्या वतीने काढण्यात आलेल्या माहिती पुस्तिकेचे प्रकाशन मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांच्या हस्ते झाले.

मुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले, सार्वजनिक उत्सव मंडळ आणि धर्मादाय संस्था, विश्वस्त मंडळाच्या नोंदणीसाठी अत्याधुनिक प्रणाली सुरू करण्यात येईल. पासपोर्टसाठी  ज्या पद्धतीने आता सुटसुटीतपणे आणि सहजपणे अर्ज, नोंदणी करता येते, त्याच पद्धतीने ही प्रक्रिया असेल. ऑनलाईन प्रणाली असल्याने कुठल्याही कार्यालयात हेलपाटे घालावे लागणार नाही. गणेशोत्सव समन्वय समिती आणि गणेशोत्सव महासंघाच्या सूचनांवर उचित निर्णय घेण्यात येईल.
 
पोलिसांनी आगमन व विसर्जन मिरवणुकीत वाहतुकीचे नियोजन व्यवस्थित करावे. तसेच पारंपरिक वाद्यांना परवानगी देण्यासंदर्भात पोलिसांनी योग्य ती भूमिका घ्यावी. गणेशोत्सव काळात जास्तीत जास्त दिवस रात्री बारा वाजेपर्यंत ध्वनिवर्धकांना परवानगी देण्यासाठी प्रयत्न करू, असेही श्री. फडणवीस यांनी सांगितले.

उत्सव काळात गणेशोत्सव मंडळांनी स्वच्छतेवर जास्तीत जास्त भर द्यावा, अशी सूचना शालेय शिक्षणमंत्री श्री. शेलार यांनी यावेळी केली. गणेशोत्सव विसर्जन मिरवणुकीत रात्री दहानंतर पारंपरिक वाद्यांना  परवानी देण्याची मागणी पुण्यातील मंडळांनी केली असल्याची माहिती श्री. भेगडे यांनी दिली.

यावेळी श्री. दहिबावकर व श्री. साळगावकर यांनी गणेश मंडळाच्या वतीने विविध सूचना केल्या.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post
DNALive24 Marathi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates