कमी दाबाचा पट्टा महाराष्ट्राकडे, मुसळधार पावसाचा इशारा


वेब टीम : मुंबई
देशाच्या मध्यवर्ती भागात कमी दाबाचा पट्टा सक्रिय आहे. तो आता पश्चिम दिशेने सरकत आहे. त्यामुळे राज्यात मागील तीन आठवडे तांडव केलेल्या पावसाचा जोर काहीसा कमी होणार आहे. आज राज्यात सर्वच भागात कमी-अधिक प्रमाणात पाऊस हजेरी लावणार आहे, तर कोकण, मध्य महाराष्ट्रातील काही जिल्हयात मुसळधार पाऊस पडणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने शुक्रवारी वर्तविला.

जुलैच्या शेवटच्या आठवडयापासून पडत असलेल्या मुसळधार पावसाने कोकण आणि मध्य महाराष्ट्रात हाहाकार उडविला आहे. येथे आत्तापर्यंतच्या मान्सून हंगामातील सर्वाधिक पाऊस पडला आहे. कोल्हापूर, सांगली आणि सातारा येथे मुसळधार पावसामुळे या भागांत बर्‍याच ठिकाणी अद्याप पूरस्थिती कायम आहे.

पुढील दोन ते तीन दिवसांत कोकण, मध्य महाराष्ट्रासह विदर्भ आणि आसपासच्या भागात पावसाचा जोर लक्षणीय प्रमाणात कमी होण्याची शक्यता आहे. पुढील दोन ते तीन दिवस केवळ हलका ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे.

मागील २४ तासात मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी अतिवृष्ट्टी झाली आहे. त्याचप्रमाणे कोकण, विदर्भात काही ठिकाणी मुसळधार तर तुरळक ठिकाणी जोरदार तर मराठवाड्यात तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडला आहे. घाटमाथा परिसरात जोरदार पावसाची हजेरी कायम आहे.

तसेच मुंबईत काही ठिकाणी मध्यम, तर काही ठिकाणी जोरदार पाऊस कोसळत आहे. सद्य:स्थितीत तरी राज्यात बहुतांश ठिकाणचा पावसाचा जोर काहीसा ओसरणार असल्याचा अंदाज आहे.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post