नगरला आयटी पार्क साठी मुलाखती सुरू- पहिल्याच दिवशी तोबा गर्दी


वेब टीम : अहमदनगर
नगरच्या एमआयडीसीमध्ये सुरु होत असलेल्या आयटीपार्क मध्ये नोकर भरती साठी दोन कंपन्यांकडून युवक-युवतींच्या मुलाखती सुरु झाल्या असून पहिल्या टप्प्यात २५० ते ३०० युवक-युवतींना रोजगार उपलब्ध होणार आहे तर डिसेंबरपर्यंत सुमारे १००० पेक्षा जास्त युवक-युवती आयटी पार्कमध्ये कार्यरत होणार आहेत. पहिल्या टप्प्यातील मुलाखतीसाठी शुक्रवारी (दि.२) सुमारे ३ हजार युवक-युवतींनी उपस्थिती दर्शविली असून ३ दिवस या मुलाखतीची प्रक्रिया चालणार आहे.

नगर एमआयडीसीत गेल्या १९ वर्षांपासून धुळखात पडलेल्या आयटीपार्क इमारतीचे आ.संग्राम जगताप यांनी पुढाकार घेऊन रुप पालटले आहे. याठिकाणी सात ते आठ आयटी कंपन्या लवकरच कार्यरत होणार आहेत. त्यातील दोन कंपन्यांनी नोकर भरतीसाठी शुक्रवारी (दि.२) सकाळपासून मुलाखतीची प्रक्रिया सुरु केली आहे. यावेळी उपस्थित युवक-युवतींना विविध पदांवर नियुक्त्या दिल्या जाणार आहेत. त्यासाठी १२वी पासून ते पदवीधरपर्यंत तसेच पदव्युत्तर पदवी धारकांना मुलाखतीसाठी बोलाविण्यात आले होते. प्रारंभी या उमेदवारांची ५० गुणांची लेखी परीक्षा घेतली जात आहे. त्यानंतर शनिवारी (दि.३) टेक्निकल राऊंड व रविवारी (दि.४) प्रत्यक्ष मुलाखती घेऊन त्यात पात्र ठरलेल्या उमेदवारांना ऑफर लेटर दिले जाणार असल्याचे सांगण्यात आले. या मुलाखतीसाठी फोर साईट सव्र्हिसेस् तसेच सनल्वा इन्फोटेक या दोन आयटी कंपन्यांचे अधिकारी नगरमध्ये आलेले असून आयुर्वेद महाविद्यालयात या मुलाखती सुरु आहेत.

  ५ वर्षात नगर आयटी हब होईल - आ.संग्राम जगताप

या मुलाखती सुरु होण्यापुर्वी आ.संग्राम जगताप यांनी उपस्थित उमेदवारांशी संवाद साधला. यावेळी बोलताना ते म्हणाले गेल्या ५ वर्षात शहरात विकासकामे करण्याबरोबरच तरुणांना शिक्षणानंतर रोजगार उपलब्ध होण्यासाठी प्रयत्न केले गेले. शहरात आयटी पार्क सुरु होण्यासाठी सातत्याने विविध कंपन्यांशी संपर्क सुरु होता, त्यास आत यश आले आहे. पहिल्या टप्प्यात २५० ते ३०० तरुणांना रोजगार उपलब्ध होणार असून डिसेंबरपर्यंत ही संख्या १००० वर जाईल आणि येत्या ५ वर्षात नगर शहर इतर महानगरांप्रमाणे आयटी हब म्हणून ओळखले जाईल. त्यासाठी प्रयत्न सुरु आहेत. शहरातील युवकांना आता रोजगारासाठी घरदार सोडून इतर शहरात जाण्याची गरज भासणार नाही. युवकांना स्वत:च्या पायावर उभे करण्यासाठी व त्यांच्या अपेक्षा पुर्ण करण्यासाठी आपण कटिबद्ध असल्याचे ते म्हणाले. यावेळी मुलाखतीसाठी आलेल्या काही युवकांनीही मनोगत व्यक्त केले. नगरमध्ये उद्योग व्यवसाय नसल्याने इच्छा नसतानाही आम्हाला इतर शहरात जाऊन रोजगारासाठी संघर्ष करावा लागत होता. मात्र आता शहरात आयटी पार्क सुरु होत असल्याने आमच्या शिक्षणाचा उपयोग आम्हाला येथेच करता येणार आहे. आ.संग्राम जगताप यांच्यामुळे नगर शहराची पेन्शनर्सचे शहर ही असलेली ओळख आता पुसली जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post