कुणालाही जिंकू द्यात, सत्ता काँग्रेस- राष्ट्रवादीचीच : सुप्रिया सुळे


वेब टीम : अहमदनगर
कुणीही जिंकले तरी सत्ता कॉंग्रेस-राष्ट्रवादीचीच' येणार आहे. ईडी, सीबीआय सारख्या यंत्रणांचा दबाव तंत्रासाठी वापर सुरू आहे. आमच्याकडे असताना वाईट असलेले, त्यांच्याकडे गेल्यावर चांगले होतात. भाजपकडे अशी कोणती वॉशिंग पावडर आहे? असा सवाल करत राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या नेत्या सुप्रिया सुळे यांनी राज्यात होत असलेल्या पक्षांतरावरुन सत्ताधारी भाजपावर निषाणा साधला आहे.

भारतीय जनता पक्षात काँग्रेस-राष्ट्रवादी मधून गेलेल्यांची गर्दी पाहता निवडणुकीत कुणीही जिंकले तरी सत्ता काँग्रेस राष्ट्रवादीचीच असेल, असा टोलाही त्यांनी लगावला आहे.

खासदार सुप्रिया सुळे आज नगर दौऱ्यावर असून व्यापारी, वकील अशा विविध क्षेत्रातील लोकांशी संवाद साधणार आहेत. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नगर शहराची बैठक घेणार आहेत. तत्पूर्वी त्यांनी पत्रकार परिषद घेऊन सरकारवर टीकास्त्र सोडले आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे एकमेव असे नेते आहेत, जे सलग 52 वर्षे निवडून आलेले आहेत. देशात असा दुसरा कोणताही नेता नाही. त्यांनी अनेक चांगले-वाईट दिवस बघितले आहेत. येत्या काळातही त्यांचा आदर्श आमच्या समोर असून पूर्ण ताकतीने नव्याने संघटना बांधणी होईल. वर्षानुवर्षे पवार साहेबांबरोबर असलेले काही नेते कुठलेही कारण नसतानाही पक्ष सोडून गेलेत, याचे दुःख निश्चितच आहे, असे त्या म्हणाल्या.

आजच्या काळात सीबीआय, ईडी हे चर्चेतले शब्द झाले आहेत. 2014 नंतरच हे शब्द जास्त चर्चेत आले आहेत. त्याआधी राजकारणात या संस्थांचा वापर होत नव्हता. विरोधी पक्षातल्या अनेकांना दररोज नोटिसा सुरू आहेत.

हे होणार याची मानसिकताही आम्ही ठेवलीच होती. मनी आणि मसल पॉवर, दडपशाही हीच भाजपची निवडणुका लढण्याची व जिंकण्याची स्टाईल आहे, अशी टीकाही त्यांनी यावेळी केली.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post