भाजप आमदारासाठी पोलिसांच्या पायघड्या; विनाहेल्मेट दुचाकी रॅली


वेब टीम : नेवासा
स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधून नेवाशाचे आ. बाळासाहेब मुरकुटे यांच्या मार्गदर्शनाखाली काढण्यात आलेली दुचाकीस्वारांची तिरंगा रॅली वादाच्या भोवर्‍यात अडकली आहे. चक्क आ. मुरकुटे यांच्याच डोक्यावर हेल्मेट नसल्याचे पाहून शेकडो दुचाकीस्वारांनीही त्यांचा हा ‘आदर्श’ घेत या रॅलीत सहभाग घेतला. सामान्यांविरुध्द नियमावर बोट ठेवून कारवाई करणार्‍या पोलिसांचे या विनाहेल्मेट रॅलीकडे दुर्लक्ष झाल्याबद्दल नेवासा तालुक्यात आश्चर्य आणि संताप व्यक्त होत आहे.

नेवासा तालुक्यातील संत ज्ञानेश्वर मंदीरापासून निघालेली ही तिरंगा रॅली थेट सोनई, शनिशिंगणापूरपर्यंत आली.  देशभक्तीपर गीतांसह निघालेल्या या रॅलीत शेकडो दुचाकीस्वार सहभागी झाले होते.

मात्र एकाच्याही डोक्यावर हेल्मेट नसल्याने नेवासा आणि सोनई पोलिसांनी पूर्णत: डोळेझाक केली. जिल्हा पोलिस अधीक्षक ईशू सिंधू यांनी हेल्मेटसक्तीच्या कायद्याची काटेकोरपणे अंमलबजावणी करण्याचे आदेश दिले असताना पोलीस याकडे का डोळेझाक करत आहेत.

सत्ताधारी आमदारासाठी हेल्मेटसक्ती कायदा शिथिल करण्यात आला की काय, सामान्यांना कायद्याचा धाक मात्र लोकप्रतिनिधीला पायघड्या, असा दुजाभाव का, असे अनेक प्रश्न या रॅलीच्या निमित्ताने उपस्थित केले जात आहेत. दरम्यान, या तिरंगा रॅलीकडे भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष सचिन देसरडा यांच्यासह अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी पाठ फिरवली.

त्यामुळे आ. मुरकुटे यांच्या लोकप्रियतेवरदेखील प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे. नेवासा आणि सोनई, शिंगणापूरचे पोलीस या रॅलीत सहभागी झालेल्यांविरुध्द कारवाई करण्याचे धाडस दाखविणार का, हा मोठा प्रश्न तालुक्यात चर्चेचा विषय झाला आहे.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post