देशासह राज्यात तीन आठवडे हवामान कोरडे राहणार


वेब टीम : मुंबई
महाराष्ट्र, मध्य प्रदेश आणि गुजरातमध्ये पावसाला आवश्यक असलेली हवामान प्रणाली सध्या कमकुवत झाली आहे. त्यामुळे पुढील काही दिवसांत पावसाचा जोर कमी होणार आहे.

 राज्यासह देशात पावसाचे प्रमाण सामान्य राहणार आहे. त्याचप्रमाणे पुढील तीन आठवडे कोरडे हवामान राहणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने शनिवारी वर्तविला.

मागील आठवड्यात पावसाने मध्य भारतात दाणादाण उडविली होती. मुसळधार पावसामुळे राज्यासह मध्य प्रदेश आणि गुजरातमध्ये मोठ्या प्रमाणात पूर आला होता. राज्यातील सांगली, नागपूर, कोल्हापूर, अकोला आणि महाबळेश्वर या ठिकाणी परिस्थिती गंभीर झाली होती.

आता बंगालच्या उपसागरातील कमी दाबाचा पट्टा अल्पकाळ टिकण्याचे संकेत आहेत. कालपासून देशात मान्सूनचा जोर कमी होण्यास सुरूवात झाली आहे. दरम्यान कमी दाबाचा पट्टा हिमालयाचा पायथ्याकडे सरकल्यामुळे ओडिसा, बिहार आणि पूर्व उत्तरप्रदेशातील तुरळक भागात पाऊस हजेरी लावणार आहे.

भारतीय हवामान विभागाने दिलेल्या पावसाच्या आकडेवारीनुसार १ जून ते १२ ऑगस्ट दरम्यान देशात ५५८ मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. त्यामुळे देशातील पर्जन्यमान कमी श्रेणीतून सामान्य श्रेणीत आले आहे.

मध्य भारतात यंदा पावसाचा जोर अधिक असल्यामुळे हा भाग यंदा पावसाचा मुख्य लाभार्थी ठरला आहे. येथे पावसाचे आधिक्य १३ टक्के आहे. दक्षिणेकडील द्वीपकल्पामध्ये पावसाचे आधिक्य ५ टक्के आहे. तर याउलट पूर्व आणि ईशान्य भारतात अजूनही पावसाची १५ टक्के कमतरता आहे.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post