Article 370 चा निर्णय घेत मोदींनी देशावरचा कलंक मिटवला; सामनातून कौतुक


वेब टीम : मुंबई
३७० कलम रद्द करण्याचा निर्णय घेऊन नरेंद्र मोदी सरकारने देशावर असलेला कलंक मिटवला. नंदनवनात स्वातंत्र्याची नवी पहाट उजाडली असल्याच्या शब्दांत शिवसेनेने सामनाच्या अग्रलेखातून मोदी सरकारचे कौतुक केले आहे.

काय म्हटलेय अग्रलेखात; वाचा पूर्ण लेख :

370 कलम रद्द करण्याचा निर्णय घेऊन 70 वर्षांपासून हिंदुस्थानच्या माथ्यावर लागलेला कलंक सरकारने आज नष्ट केला. कश्मीरचे खऱ्या अर्थाने आता हिंदुस्थानात विलीनीकरण झाले आहे. 9 ऑगस्टचा क्रांतिदिन, 15 ऑगस्टचा स्वातंत्र्य दिन आणि आता कश्मीरला मोकळा श्वास देणाऱ्या 5 ऑगस्टच्या ऐतिहासिक दिनाने ऑगस्ट महिन्याचे पावित्र्य आणखी वाढवले आहे. देशद्रोहय़ांच्या छाताडावर बसून बजावलेल्या या धाडसी, साहसी, अद्भुत आणि अचाट कामगिरीबद्दल शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे, दीनदयाल उपाध्याय, श्यामाप्रसाद मुखर्जी आणि अटलबिहारी वाजपेयीदेखील स्वर्गातून आज या सरकारवर नक्कीच पुष्पवृष्टी करत असतील!

देशद्रोह्यांच्या धमक्यांना भीक न घालता जम्मू-कश्मीरचे फाजील लाड करणारे घटनेतील 370 हे वादग्रस्त कलम सरकारने आज मुळासकट उखडून फेकून दिले आहे. कलम 370 हा देशाशी केलेला विश्वासघात होता. हिंदुस्थानचे स्वातंत्र्य आणि सार्वभौमत्वावर लागलेला तो कलंक होता. तो कलंक आज नष्ट झाला आहे. या 370 कलमाच्या सैतानामुळेच जम्मू-कश्मीर हिंदुस्थानच्या मुख्य प्रवाहापासून तुटले होते. याच कलमामुळे कश्मीरातील फुटीरतावादी पाकिस्तानच्या प्रेमात पडून हिंदुस्थानातून फुटून बाहेर पडण्याचे आणि ‘वेगळे राष्ट्र’ बनवण्याचे मनसुबे आखत होते. कश्मीरात मागील काही दशकांमध्ये जो दहशतवाद फोफावला त्याचे मूळ 370 आणि 35‘अ’ या कलमांमध्येच दडले होते. त्या मुळावरच आज सरकारने घाला घातला. कलम 370 च्या भस्मासुरामुळेच एकाच देशात दोन निशाण, दोन विधान आणि दोन पंतप्रधान करण्याची नामुष्की हिंदुस्थानवर ओढवली होती. तो भस्मासुर आज कायमचा गाडला गेला आहे. हिंदुस्थानचा कुठलाही नागरिक जम्मू-कश्मीरात जाऊन जमीनजुमला खरेदी करू शकत नव्हता, घरदार घेऊ शकत नव्हता, उद्योगधंदा सुरू करू शकत नव्हता. इतकेच काय, तिथे जाऊन कायमस्वरूपी वास्तव्यही करू शकत नव्हता. एखाद्या विदेशात गेल्याप्रमाणे केवळ पर्यटक म्हणूनच कश्मीरात जावे, असे बंधन या देशातील जनतेवर घालण्यात आले. पाकिस्तानच्या घुसखोर अतिरेक्यांना वर्षानुवर्षे पोसणाऱ्या कश्मीरात हिंदुस्थानच्या नागरिकांना मात्र कुठलीच मुभा नव्हती. ज्यामुळे कश्मीरातील फुटीरतावादी माजले होते, ते कलम 370 रद्द व्हावे हे हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख श्री. बाळासाहेब ठाकरे यांचे स्वप्न होते. शिवसेनाप्रमुखांचे आणि देशातील तमाम राष्ट्रवादी जनतेचे हे स्वप्न आज साकार झाले आहे. देशवासीयांसाठी याहून

आनंदाचा क्षण

दुसरा काय असू शकतो? हिंदुस्थानच्या नकाशावर असूनही कलम 370 मुळे जम्मू-कश्मीरला जो विशेष राज्याचा दर्जा देण्याची ऐतिहासिक घोडचूक 70 वर्षांपूर्वी झाली होती, ती चूक दुरुस्त करण्याचे महान कार्य मोदी सरकारने आज संसदेत पार पाडले. या साहसी कामगिरीबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांचे अभिनंदन करण्यासाठी आज शब्दही थिटे पडत आहेत. हिंदुस्थानच्या कानाकोपऱ्यातच नव्हे तर जगभरात विखुरलेल्या प्रत्येक हिंदुस्थानी माणसाचे मन आज अत्यानंदाने प्रफुल्लित झाले आहे. जम्मू-कश्मीरात काय होणार यावरून गेला महिनाभर देशभरात काहूर माजले होते. सरकारने आधीच सैन्याच्या ताब्यात असलेल्या जम्मू-कश्मीरमध्ये 38 हजार जवानांच्या आणखी फौजा धाडून धाडसी पाऊल उचलण्याचे संकेत दिले होते, झालेही तसेच. गृहमंत्री अमित शहा यांनी कलम 370 रद्द करण्याचा प्रस्ताव राज्यसभेत सादर करून ‘रिश्टर स्केल’चे यंत्रच मोडून टाकणारा पहिला भूकंप घडवला. 370 मधील अनुच्छेद क्र. 1 वगळता उर्वरित संपूर्ण कलम हटवण्यात आल्याची ही घोषणा होताक्षणी देशभरात आनंदोत्सव सुरू झाला. या घोषणेने सुन्न आणि अर्धमेले झालेले विरोधक पोरकटपणे या ऐतिहासिक विधेयकाला विरोध करत असतानाच अमित शहा यांनी दुसरी सुनामी आणली. जम्मू-कश्मीरमधून लडाखला वेगळे करण्यात येत आहे आणि यापुढे लडाख हा स्वतंत्र केंद्रशासित प्रदेश असेल, अशी घोषणा गृहमंत्र्यांनी केली. तिसऱ्या घोषणेने मात्र जम्मू-कश्मीरमधील फुटीरतावादी नेते आणि देशद्रोही नेत्यांच्या बुडाखाली जणू ज्वालामुखीचाच उद्रेक घडवला. जम्मू-कश्मीरचा वेगळय़ा राज्याचा दर्जा काढून तो केंद्रशासित प्रदेश करण्यात आल्याची घोषणा गृहमंत्र्यांनी केली. देशातील प्रत्येक नागरिकाची छाती या निर्णयाने अभिमानाने फुलून गेली आहे. 370 कलम रद्द करण्याचे आश्वासन शिवसेना-भाजप युतीने लोकसभा निवडणुकीत दिले होते, ते आज पूर्ण झाले. देशात एक

मजबूत आणि पोलादी सरकार

सत्तेवर आहे, असा संदेश देणारा हा निर्णय आहे. ही कामगिरी साधीसुधी नव्हे तर अलौकिक आहे. ‘370 को हाथ लगायेंगे तो हाथ जला देंगे’ अशा धमक्या कश्मीरातील देशद्रोही नेत्यांनी दिल्या होत्या. दम असेल तर या पाकधार्जिण्या नेत्यांनी आता आगलावू भाषा वापरून दाखवावीच. कश्मीरात आधीच पोहोचलेल्या फौजा त्यांना भस्मसात केल्याशिवाय राहणार नाहीत. 370 कलम रद्द करण्याचा निर्णय घेऊन 70 वर्षांपासून हिंदुस्थानच्या माथ्यावर लागलेला कलंक सरकारने आज नष्ट केला. कश्मीरचे खऱ्या अर्थाने आता हिंदुस्थानात विलीनीकरण झाले आहे. 9 ऑगस्टचा क्रांतिदिन, 15 ऑगस्टचा स्वातंत्र्य दिन आणि आता कश्मीरला मोकळा श्वास देणाऱ्या 5 ऑगस्टच्या ऐतिहासिक दिनाने ऑगस्ट महिन्याचे पावित्र्य आणखी वाढवले आहे. देशद्रोहय़ांच्या छाताडावर बसून बजावलेल्या या धाडसी, साहसी, अद्भुत आणि अचाट कामगिरीबद्दल शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे, दीनदयाल उपाध्याय, श्यामाप्रसाद मुखर्जी आणि अटलबिहारी वाजपेयीदेखील स्वर्गातून आज या सरकारवर नक्कीच पुष्पवृष्टी करत असतील! अखंड हिंदुस्थानचे निम्मे स्वप्न आज पूर्ण झाले, भविष्यात पाकव्याप्त कश्मीरच नव्हे तर पाकिस्तानही विलीन करून घेण्याची ताकद आणि धमक या सरकारमध्ये आहे, याची नोंद शेजारच्या बाटग्यांनी घ्यावी. कश्मीरचे सुंदर नंदनवन जिहादच्या नावाखाली 70 वर्षे जळत राहिले. कलम 370 च्या स्मशानातून कश्मीरच्या नंदनवनात  आता स्वातंत्र्याची पहाट नक्कीच उगवेल. काँग्रेससह देशातील तमाम राजकीय पक्षांनीही सगळे भेद बाजूला ठेवून या देशहिताच्या निर्णयाचे समर्थन करायला हवे. पण विरोधक खरेच सुधारतील काय?

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post