अवघ्या महाराष्ट्रात शिवसेनेचा भगवा फडकणारच – उपनेते नितीन बानगुडे


वेब टीम : अहमदनगर
शिवरायांच्या मावळया प्रमाणेच प्रत्येक शिवसैनिक लाख मोलाचा आहे. मी म्हणजे महाराष्ट्र… महाराष्ट्र म्हणजे मी, ही जाण ठेवुन शंभर वर्षाचा विकसित महाराष्ट्र घडविण्यासाठी आपल्याला मोठे काम करायचे आहे. आगामी विधानसभा निवडणुकीत शिवसेनेचा भगवा महाराष्ट्रात फडकणारच आहे, दरम्यान राज्यात काँग्रेस आघाडीचे ‘टांगा पलटी, घोडे फरार’ झाले आहेत. पण येणार्‍या निवडणुकीत ते जातीचे विषय पेरतील. त्यामुळे सावध रहा, असा इशारा शिवसेना उपनेते नितीन बानगुडे यांनी दिला.

शिवसेनेच्यावतीने मंगळवारी (दि.17) शहरातील पटेल मंगल कार्यालयात आयोजित ‘मी महाराष्ट्र निश्‍चय मेळाव्यात’ मार्गदर्शन करताना बानगुडे पाटील बोलत होते. यावेळी शिवसेनेचे उपनेते अनिल राठोड, जिल्हा प्रमुख प्रा. शशिकांत गाडे, शहरप्रमुख दिलीप सातपुते आदींसह नगरसेवक, पदाधिकारी व शिवसैनिक उपस्थित होते.

प्रा. बानगुडे पुढे म्हणाले, महाराष्ट्राचे उज्वल भविष्य आपल्याला घडवायचे आहे. शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांचे व्यापक विचार आपल्याला पुढे न्यायचे आहेत. ‘मी महाराष्ट्र’ या संकल्पनेतून आपल्याला आता महाराष्ट्राचा विकास हेच स्वप्न घेऊन पुढे जायचे आहे. त्यामुळे प्रत्येक शिवसैनिकाची जबाबदारी महत्वाची आहे. भगव्याचे तोल व मोल राखले गेले पाहिजे. महाराष्ट्र कोणा लुंग्या-सुंग्याचा नाही हा शिवरायांचा महाराष्ट्र आहे, हे लक्षात ठेवा. महाराष्ट्र म्हणजे शिवसेना आणि शिवसेना म्हणजे महाराष्ट्र असे अतुट नाते गेल्या 50 वर्षापासून आहे. महाराष्ट्राच्या अस्मितेचा विषय जेव्हा जेव्हा येतो, तेव्हा शिवसेना आपली भुमिका ठामपणे मांडत असते. महाराष्ट्रही राष्ट्राची गरज आहे व शिवसेना महाराष्ट्राची गरज आहे असेही ते म्हणाले. मागील 15 वर्षे काँगेस राष्ट्रवादी आघाडीची सत्ता होती. त्यांनी सत्तेचे फायदे आपल्यापुरते बघितले. आपल्या ताटात त्यांनी ते ओढून घेतले. त्यांनी कधीच समतोल, विकास पाहिला नाही म्हणून आता समतोल विकास होणे ही महाराष्ट्राची गरज आहे.

महाराष्ट्रात अडीच लाख सहकारी संस्था असून त्यांचे साडेपाच कोटी सभासद आहेत. काँगेस राष्ट्रवादी या संस्थांच्या माध्यमातुन सत्तेमध्ये येतात. त्यांनीच हया संस्थाची वाट लावली आहे. नेते गब्बर झाले असून त्यांनीच सहकार चळवळ मोडीत काढली आहे.

अर्थव्यवस्था मंदीच्या खाईत
सध्या अर्थव्यवस्था मंदीच्या खाईत आहे. सर्वसामान्य मेटाकुटीला आलेला आहे. राज्यात नऊ हजार अभियांत्रिकी महाविद्यालये आहेत पण याठिकाणी 68% लोक शेती करतात. त्या राज्यात अवघी चार कृषी विद्यापीठे आहेत. शेतकरी आत्महत्या का करतो? याचा कुणी कधी विचार केला काय? शेतकर्‍यांनी पिकवलेल्या मालाला हमीभाव दिला पाहिजे. शेतकर्‍यांचे प्रश्न सोडवले पाहिजे. त्यामुळे मी महाराष्ट्र… मी शेतकरी अशी भुमिका घेऊन आपल्या वाटचाल करायची असल्याचेही ते म्हणाले. मुले शिकली पाहिजेत. रोजगार उपलब्ध झाला पाहिजे. गुन्हेगारी मुक्त महाराष्ट्र कधी होणार हा खरा प्रश्न आता विचारला जात आहे. महाराष्ट्र समृध्द करायचा तर प्रत्येकाच्या हाताला काम, रोजगार दिला पाहिजे.

अनिल राठोड म्हणाले, काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीवरचा जनतेचा विश्वास उडालेला आहे. हे पक्ष आता बाजुला फेकले गेले आहे. आगामी काळात नवा महाराष्ट्र घडविण्यासाठी प्रत्येक शिवसैनिकाला झटावे लागणार आहे. त्यासाठी शिवसेनेचे विचार घेऊन वाटचाल करायची आहे. प्रत्येक शिवसैनिकाने शिवसेनेचे कार्य तळागाळापर्यत पोहचवावे, असे म्हणाले.

कार्यकर्त्यांनी आपली वर्तुळे निश्‍चित करुन घ्यावीत
राज्याच्या, देशाच्या हितासाठी तरुणांनी राजकारणात आलेच पाहिजे परंतु राजकारणात आल्यानंतर मी निवडणूक लढलीच पाहिजे मी आमदार झालोच पाहिजे पाहिजे, मंत्री झालोच पाहिजे असे नाही प्रत्येक कार्यकर्त्याने पक्षात आपली वर्तुळे निश्‍चित करुन घेतली पाहिजेत. छत्रपती शिवाजी महाराजांबरोबर सर्व मावळे होते. ते कधी शिवाजी महाराजांच्या जागी बसण्याची ईच्छा बाळगत नव्हते. शिवाजी महाराज होते म्हणून मावळे होते आणि मावळे होते म्हणून शिवाजी महाराजांना स्वराज्य स्थापन करता आले. असे उदाहरण देत सध्या अनिल राठोड आहेतच त्यांचे पूर्ण होऊ द्या मग तुमचे बघा असा अप्रत्यक्ष टोला शिवसेना उपनेते नितीन बानगुडे पा. यांनी नगरमधील पक्षाच्या इच्छुक उमेदवारांना लगावला.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post