आघाडी सरकारने योजना सुरु ठेवल्या नाहीत : मुख्यमंत्री


वेब टीम : इस्लामपूर
पाच वर्षांमध्ये आमच्या सरकारने शेतकर्‍यांच्या खात्यामध्ये पन्नास हजार कोटी रुपये जमा केले आणि पश्‍चिम महाराष्ट्रातील सर्व योजना सुरू ठेवल्या.

राष्ट्रवादी व काँग्रेसने मात्र या योजना सुरू ठेवल्या नव्हत्या असा आरोप मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांनी कासेगाव (ता. इस्लामपूर) येथे बोलताना केला.

महाजनादेश यात्रेच्या स्वागत कार्यक्रमात बोलत होते. शिराळा विधानसभा मतदार संघाच्यावतीने भाजप कार्यकर्त्यांनी मुख्यमंत्री फडणवीस, महसूलमंत्री चंद्रकांत पाटील, मंत्री सदाभाऊ खोत, आमदार शिवाजीराव नाईक व नुकताच भाजपात प्रवेश केलेले काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस सत्यजित देशमुख यांचे पुष्पहार घालून स्वागत केले.

मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, मोदीजींनी मंत्र दिल्याप्रमाणे गरिबाची जात, भेद, पंथ, भाषा न बघता त्याचा विकास झाला पाहिजे. त्याप्रमाणे आम्ही अडचणी दूर करत कामे करतो. 2022 पर्यंत भाजप सरकारच्या राज्यात एकही माणूस गरीब बेघर दिसणार नाही, असा संकल्प राबवणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

राज्यात आरोग्य सुविधांबरोबर व्यवसाय, उद्योगधंदेही चांगले सुरू असल्याचे त्यांनी नमूद केले. पश्‍चिम महाराष्ट्रामध्ये काँग्रेसपेक्षा आमच्या सरकारने जादा निधी देऊन मोठा विकास केला आहे. काँग्रेसमधून भाजपात प्रवेश केलेल्या सत्यजित देशमुखांना संधी देऊन आमचे सरकार निश्‍चितच सोने करेल, अशी घोषणाही त्यांनी केली.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post