अमिताभ बच्चन यांना दादासाहेब फाळके पुरस्कार घोषित


वेब टीम : दिल्ली
बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांना प्रतिष्ठेचा दादासाहेब फाळके पुरस्कार घोषित झाला आहे. माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने ही माहिती आज दिली.

अमिताभ बच्चन यांचे नाव सर्वसंमतीने निवडण्यात आले, असे केंद्रीय माहिती मंत्री प्रकाश जावडेकर यांनी सांगितले.

‘बिग बी’ पाच दशकांपासून बॉलिवूडमध्ये काम करत आहेत. त्यांच्याकडून अनेकांना प्रेरणा मिळाली आहे. अमिताभ यांना दादासाहेब फाळके पुरस्कार जाहीर झाल्याने संपूर्ण देश तसेच परदेशातील लोकांना आनंद झाला आहे.

माझ्याकडून अमिताभ यांना मन:पूर्वक शुभेच्छा, असे जावडेकर यांनी ट्विटरवरून म्हटले आहे.

अमिताभ बच्चन यांनी १९६९ साली ‘सात हिंदुस्तानी’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते.

त्यानंतर ‘बिग बी’ यांनी अनेक हिट चित्रपट दिले आहेत. ७६ व्या वर्षीही ते चित्रपटांमध्ये काम करत आहेत.

झुंड, सायरा नरसिम्हा रेड्डी, तेरा यार हूं मैं, बटरफ्लाय, एबी यानी सीडी, ब्रह्मास्त्र, चेहरे और गुलाबो सिताबो या चित्रपटांत त्यांची प्रमुख भूमिका आहे.

अमिताभ यांनी छोट्या पडद्यावरही आपल्या अभिनयाचा ठसा उमटवला आहे. रिअॅलिटी शो ‘कौन बनेगा करोडपती’मधील त्यांचे सूत्रसंचालन खूप लोकप्रिय आहे.

दादासाहेब फाळके पुरस्कार घोषित झाल्याबद्दल आशा भोसले, रजनीकांत, अभिषेक बच्चन, करण जोहर, अनिल कपूर व इतरांनी अमिताभ बच्चन यांचे अभिनंदन केले आहे.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post