धनगर समाजाच्या विकासासाठी एक हजार कोटी


वेब टीम : मुंबई
धनगर समाजाच्या विकासासाठी 1 हजार कोटी रुपयाचा निधी उपलब्ध करुन दिल्याबद्दल अमरावती येथे नुकताच पार पडलेल्या लाभ वाटप मेळाव्यात इमाव, साशैमाप्र, विजाभज व विमाप्र कल्याणमंत्री डॉ. संजय कुटे यांचा सत्कार करण्यात आला.

आदिवासी विकास विभागामार्फत अनुसूचित जमाती प्रवर्गासाठी सुरु असलेल्या योजनांच्या धर्तीवर राज्यातील धनगर समाज बांधवांच्या विकासासाठी विशेष कार्यक्रम राबविण्याचा निर्णय नुकताच घेण्यात आला आहे. या कार्यक्रमाची अंमलबजावणी करण्यासाठी सन 2019-20 या आर्थिक वर्षासाठी रु.1000.00 कोटी एवढा निधी उपलब्ध करुन देण्यात आला आहे. या संदर्भातील राबवायच्या सर्व योजनांचे निकष, अटी शर्ती, आर्थिक तरतुदी आणि योजना राबवणारे विभाग असा शासन निर्णयही जाहीर झाला आहे.

अमरावती विभागात डॉ. संजय कुटे आणि कृषिमंत्री तथा पालकमंत्री डॉ. अनिल बोंडे आणि  आमदार सुनील देशमुख यांच्या उपस्थितीत नुकत्याच पार पडलेल्या कामगार विभागाच्या लाभ वाटप मेळाव्यामध्ये या शासन निर्णयाबद्दल धनगर समाज बांधवांना माहिती देण्यात आली. यावेळी धनगर बांधवांनी डॉ. संजय कुटे यांना मानाची धनगर पगडी, घोंगडी आणि काठी देऊन त्यांचा सन्मान केला.

पहिल्या टप्प्यात दहा हजार घरकुल बांधकाम, मेंढ्या वाटप, मेंढी पालनासाठी बंदिस्त अर्ध बंदिस्त जागा विकत घेण्यासाठी अनुदान उपलब्ध करून देणे, पावसाळ्यातील चार महिन्यांकरिता मेंढी  पालनाकरिता चारा अनुदान, महिला सहकारी संस्थांसाठी 10 शेळ्या व एक बोकड वाटपाची योजना राबविण्यात येत आहे.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post