नगरमध्ये गणेश विसर्जनासाठी डिजे बंदी, परवानगी नाकारली


वेब टीम : अहमदनगर
गेल्या 10 दिवसांपासून सुरु असलेल्या सार्वजनिक गणेशोत्सवाची सांगता गुरुवारी (दि.12) रोजी होत असून नगरमध्ये मानाच्या 12 गणपती मंडळांची विसर्जन मिरवणूक निघणार आहे. या मिरवणुकीत पोलिस प्रशासनाने गतवर्षीप्रमाणे याही वर्षी डिजेला परवानगी नाकारली असल्याने पारंपरिक वाद्याच्या गजरातच ही मिरवणूक होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

शहराचे ग्रामदैत माळीवाडा येथील श्री विशाल गणेशाची उत्थापनपुजा जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांच्या हस्ते सकाळी 8 वाजता होईल. त्यानंतर सकाळी 9.30 वाजता विसर्जन मिरवणुकीस प्रारंभ होणार आहे. या विसर्जन मिरवणुकीत मानाच्या विशाल गणेशापाठोपाठ महालक्ष्मी, कपिलेश्‍वर, दोस्ती, आदीनाथ, आनंद, नवरत्न, समझोता, निलकमल, शिवशंकर, माळीवाडा व नवजवान तरुण मंडळ अशा मानाच्या मंडळांचा समावेश असणार आहे. उच्च न्यायालयाच्या आदेशाप्रमाणे पोलिसांनी गतवर्षी विसर्जन मिरवणुकीत डिजे वाजविण्यास बंदी केली होती. त्यामुळे गेल्या 25 वर्षात प्रथमच डिजेशिवाय गणेश विसर्जन मिरवणूक पार पडली होती. ढोल-ताशासह पारंपारिक वाद्यांच्या गजरात गणरायाला निरोप देण्यात आला होता. त्यावेळी डिजे परवानगी द्यावी अशी मागणी 9 गणेश मंडळांनी करत मिरवणुकीवर बहिष्कार टाकला होता. तसेच या मंडळांनी प्रवरा संगम येथे जाऊन गणेश मुर्तींचे विसर्जन केले होते. यावर्षीही मंडळांच्या अध्यक्षांनी शहर विभागाचे पोलिस उपाधिक्षक संदीप मिटके यांची भेट घेऊन मिरवणुकीत डिजेला परवानगी देण्याची मागणी केली मात्र उपाधिक्षक मिटके यांनी ही मागणी अमान्य करत डिजे बंदी कायम राहिल असे स्पष्ट बजावलेले आहे.

डिजेबंदीचे उल्लंघन केल्याने मंडळाचे अध्यक्ष, कार्यकर्ते तसेच डिजेमालकांवरही गुन्हे दाखल होत असल्याने यावर्षी बहुतांश मंडळे डिजेऐवजी पारंपरिक वाद्यांच्या गजरातच गणेश विसर्जन मिरवणूक काढण्याच्या मानसिकतेत आहेत. तसे झाल्यास यावर्षी पुन्हा डिजेमुक्त विसर्जन मिरवणूक पार पडेल.

गणेश विसर्जन मिरवणूक मार्गावरील इमारतीची छते पोलिस ताब्यात घेणार
नगर शहरात दि. 12 सप्टेंबर रोजी श्री गणेश विजर्सन मिरवणूक काढण्यात येणार आहे. याप्रसंगी शांततेचा कोणताही भंग होऊ नये यासाठी महाराष्ट्र पोलीस अधिनियमन 1951 चे कलम 39 अन्व्ये प्राप्त झालेल्या अधिकाराचा वापर करुन पोलिस प्रशासनाकडून गणेश विसर्जन मिरवणूक मार्गावरील छते (गच्ची) ताब्यात घेण्यात येणार आहेत.

नगर शहरातील श्री गणेश विसर्जन मार्गावरील – कापड बाजार, बाबुशेठ बोरा, शहाजी चौक, नितू ड्रेस, शांतीलाल चोपडा, कापड बाजार, मोची गल्ली कॉर्नर, शाम देडगावकर, साफल्य इमारत, पाटेगल्ली कॉर्नर, डॉ. कुलकर्णी यांची इमारत, नवीपेठ मनपा दवाखाना, कन्हैय्यालाल चंगेडिया, नवीपेठ इचरजबाई फिरोदिया शाळेची इमारत, खामकर चौक, लोढा हाईटस, राम मंदिर, छाया टॉकिज, बडवे हॉस्पीमटल, डी चंद्रकात टेलर्स, संतोष गुगळे याची इमारत, रंगारगल्लीकडे जाणारे रोड, डॉ. सुंदर गोरे हॉस्पीटल, चौपाटी कारंजा, दिपाली एक्झीबिटर बिल्डींग, बेलदार गल्ली कॉर्नर, सुरतवाला बिल्डींग, तेलीखुंट, संतोष गुगळे यांची इमारत खामकर चौक, सुनहरी मस्जिद अल्पना बेकरीचे वर चितळे रोड, उल्हास टेलर्स राजू ढोरे यांची इमारत नेता सुभाष चौक, देशबंधु हॉटेल श्रीमती गोंगे यांची इमारत चितळे रोड, दिपक ऑईल डेपो दिपक परदेशी, गणेश अष्टेकर, कागद कुट्टा मस्जिद ट्रस्टी शेख चॉंद भाई, पटेल मेडिक, तांबे मेडिकल सुभाष पाठक, दत्त मदिर ट्रस्ट श्री गोरेगावकर यांची इमारत चौपाटी कारंजा, दिल्लीगेट वेस या इमारतींचे छते (गच्ची) गुरुवारी (दि. 12) सकाळी 8 वाजेपासून (दि. 13) सकाळी 8 वाजेपर्यंत तात्पुरत्या स्वरुपात ताब्यात घेण्यात येणार आहेत असे पोलीस अधीक्षक ईशू सिंधू यांनी सांगितले आहे.

27 रस्त्यांवर प्रतिबंधात्मक आदेश लागू
गणपती विसर्जन मिरवणुकीत कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी मिरवणूक मार्गाला येऊन मिळणार्‍या डाव्या व उजव्या बाजूच्या मिळून एकुण 27 रस्त्यांवर नगरच्या उपविभागीय दंडाधिकार्‍यांनी प्रतिबंधात्मक आदेश लागू केले आहेत.

नगरमध्ये गणेश विसर्जनाची रामचंद्र खुंट येथून मिरवणूक सुरू होते व नेप्ती नाक्याजवळ असणार्‍या बाळाजी बुवा विहिरीमध्ये गणेशमूर्तीचे विसर्जन केल्यानंतर मिरवणुकीची सांगता होते. गणपती विसर्जन मिरवणूक शांततेत व उत्साहाच्या वातावरणात पार पडावी, मिरवणुकीमध्ये कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी प्रशासन विविध उपाययोजना करीत आहे. विसर्जन मिरवणूक मार्गाला डाव्या बाजूने येऊन मिळणार्‍या 15 व उजव्या बाजूने येऊन मिळणार्‍या 12 रस्त्यांवर प्रतिबंधात्मक आदेश लागू करण्यात आले आहेत. त्यानुसार मिरवणूक सुरू असताना मिरवणूक मार्गाला येऊन मिळणार्‍या या 27 रस्त्यांचा मिरवणूक मार्गापासून शंभर मीटर अंतरापर्यंत वापर करण्यास प्रतिबंध असणार आहे.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post