भाजपच्या आमदारांना पुणेकरांनी घरी बसवावे : माजी आमदार मोहन जोशी


वेब टीम : पुणे
पुणेकरांना हक्काचे १८ टीएमसी पाणी मिळायलाच हवे ही मागणी डावलून महापालिका आणि जलसंपदा खात्यात करार झाल्यास भाजपच्या आमदारांना पुणेकरांनी पराभूत करुन घरी बसवावे अशी खरमरीत प्रतिक्रिया काँग्रेसचे माजी आमदार आणि प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस मोहन जोशी यांनी व्यक्त केली आहे.

पुणे महापालिका आणि जलसंपदा विभाग यांच्यातील पाणी वाटप कराराची मुदत ३१ ऑगस्ट रोजी संपत आहे. हा करार परत न झाल्यास पालिकेला दुप्पट दराने पाणी घ्यावे लागणार आहे. त्याचा फटका पुणेकरांना बसणार आहे. या उदासीनतेला पालिका आणि राज्यातील सत्ताधारी भाजप जबाबदार आहे.

पुणेकरांना हक्काचे १८ टीएमसी पाणी मिळावे याकरिता गेले वर्षभर काँग्रेस पक्ष मागणी करीत आहे. राज्य सरकारने ११.५० टीएमसी पाणी कोटा मंजूर केला आहे असे जलसंपदा विभागाच्या अधिकार्‍यांकडून सांगण्यात येत आहे. याबाबत महापौर मुक्ता टिळक आणि भाजपच्या आमदारांनी पुणेकरांना विश्वासात घेऊन खुलासा करणे आवश्यक आहे.अशी मागणी जोशी यांनी पत्रकात केली आहे.

वाढीव लोकसंख्येची अधिकृत माहिती दिल्याशिवाय अधिकचा पाणीपुरवठा होणार नाही अशी भूमिका जलसंपदा विभागाने घेतली आहे. जुन्या कराराला जलसंपदा विभागाने तीन महिने मुदतवाढ देऊनही महापालिकेतील भाजपचे सत्ताधारी आणि आमदार निष्क्रीय राहिले. त्यांच्या अनास्थेचा फटका पुणेकरांना बसत असेल तर काँग्रेस पक्ष हे सहन करणार नाही, त्याविरुद्ध आंदोलन करेल. १८ टीएमसी पाणी पुणेकरांच्या हक्काचे आहे. ते मिळाले नाही तर येत्या विधानसभा निवडणुकीत पुणेकरांनी भाजपच्या आमदारांना घरी बसवावे अशी तीव्र प्रतिक्रिया मोहन जोशी यांनी दिली आहे.

गेल्या वर्षी अनावश्यक पाणीकपात झाली तेव्हा काँग्रेस पक्षाने आंदोलने केली. त्यावेळी भाजपच्या आमदारांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन पुणेकरांच्या मागणीला न्याय देणार असल्याचा देखावा केला बाकी काही केले नाही. पुण्याची लोकसंख्या वाढते आहे. अनेक भागात पाण्याच्या समस्या आहेत मात्र, त्याचे गांभीर्य सत्ताधारी भाजपला नाही असेच दुर्दैवाने म्हणावे लागेल असे जोशी यांनी म्हटले आहे.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post