आम्हाला संपवायला निघालेले कधीच संपले ; प्रशांत गडाखांचा आ. मुरकुटे यांच्यावर हल्लाबोल


वेब टीम : अहमदनगर
2014 च्या राजकीय परिवर्तनातून तालुक्याच्या परिस्थितीत तसूभरही फरक पडलेला नसतांना ‘मेव्हणे, मेव्हणे आणि मेव्हण्यांचे पाहुणे’ यातच गुंतून पडलेल्या आमदार  मुरकुटेंसह त्यांच्या नातेवाईकांचे मात्र झपाट्याने परिवर्तन आहे अशी टीका युवा नेते प्रशांत गडाख यांनी आ.मुरकुटेंवर केली आहे.

आमदार बाळासाहेब मुरकुटे यांच्या मूळ गाव देवगाव येथील श्रीराम मंदिराच्या सभागृहात युवा नेते प्रशांत गडाख यांच्या मार्गदर्शनाखाली क्रांतिकारी शेतकरी पक्षाचा ‘संवाद मेळावा’ संपन्न झाला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पांडुरंग पाडळे गुरुजी होते.

यावेळी देवगाव, भेंडा, कुकाणा, नांदूरशिकारी, रांजणगावदेवी येथील ग्रामस्थ व युवकांनी क्रांतिकारी पक्षात जाहीर प्रवेश केला. यावेळी दीपाली वाल्हेकर आणि इरफान शेख या दोन गरजू होतकरू विद्यार्थ्यांचे शैक्षणिक पालकत्व यशवंत सामाजिक प्रतिष्ठानच्या माध्यमातून गडाख यांनी स्वीकारले.

श्री. गडाख पुढे म्हणाले, जिल्ह्यातील विखे, तनपुरे, पाचपुते, कोल्हे, गडाख आदी दिग्गज नेत्यांना सत्ता मिळाल्यापासून बंगला बांधण्यास 15-20 वर्षांचा कालावधी लागलेला असताना आमदार मुरकुटे यांनी अवघ्या दीड वर्षांत आलिशान सर्व सुखसोयींनी युक्त बंगला बांधून त्यांच्यातील झटपट परिवर्तनाचे दर्शन घडवल्याकडे गडाख यांनी लक्ष वेधले. यावेळी विधानसभा निवडणुकाचा प्रचाराचा नारळ फोडून गडाख यांनी प्रचाराची रणधूमाळी उडवून दिली.

आमदार मुरकुटे यांच्यावर घणाघाती हल्ला चढवत गडाख पुढे म्हणाले, आमची चाळीस वर्षांची दहशत असल्याचा आरोप करताना त्यातील थोडी न थीडकी तब्बल पंधरा वर्षे ते आमच्यासोबत कसे घालवले? असा खडा सवाल त्यांनी उपस्थित केला. तुम्ही तर अवघ्या पाच वर्षांतच देवगावात दहशत माजविली आहे, हे का विसरता? असा प्रतिप्रश्न त्यांनी विचारला.

पाच वर्षांत केलेल्या पापांमुळेच तुमच्यावर गावात सभा घेऊन चुकांची माफी मागायची वेळ ओढवली, याचे आत्मपरीक्षण करण्याचे आवाहन गडाख यांनी दिले. ज्या गावाने तुम्हाला डोक्यावर घेऊन सत्ता प्राप्त करून दिली, सत्तेच्या माध्यमातून तुम्ही त्या गावाचे, ग्रामस्थांचे वाटोळे केल्याचा सनसनाटी आरोप त्यांनी केला. गडाख हे विचार घेऊन मार्गक्रमण करणारे कुटुंब असल्याने राजकीय यशापयशातही भक्कमपणे टिकून असल्याचे नमूद करून आम्हाला संपवायला निघालेले कधीच संपले, याचे भान आम्हाला संपवण्याची भाषा करणाऱ्या आमदार मुरकुटे यांनी ठेवण्याचा सल्ला गडाख यांनी दिला.

आपल्या आजारपण आणि खाण्यापिण्याच्या मुद्द्यावरून आमदार मुरकुटे घाणेरडे राजकारण करत असल्याचे त्यांनी पुराव्यासह उपस्थितांसमोर मांडले.लोकभावनेचा आदर राखून तालुक्यात रचनात्मक कामांसह शेतकऱ्यांच्या प्रश्नावर एकत्र काम करण्याचा राजकारणविरहित सहकार्याचा हात आपण जाहीरपणे केल्याकडे गडाख यांनी लक्ष वेधून आमदार मुरकुटे यांनी मात्र व्यक्तिद्वेषाला गोंजारून त्यास प्रतिसादच दिला नसल्याचा दावा केला.

आमदार मुरकुटे यांची पत्नी संचालिका असलेली पतसंस्था ठेवीदारांचे पैसे परत देण्यास टाळाटाळ करत असल्याने ठेवीदारांच्या मुलींचे विवाह खोळंबल्याचा त्यांनी गंभीर आरोप केला. आमच्या ताब्यातील संस्थांमध्ये तर असे प्रकार घडत नसल्याचे त्यांनी यावेळी निदर्शनास आणून दिले. सरकारी नोकरीला लावतो म्हणून देवगावातीलच सुशिक्षित बेरोजगार तरुणास लाखो रुपयांना कोणी गंडा घातला ते हे ग्रामस्थ विसरले नसल्याचेही त्यांनी यावेळी नमूद केले.

सत्तेचा गैरफायदा घेऊन यांनी काय काय कुटाणे केले त्याचा परदाफाश आगामी काळात करणार असल्याचे त्यांनी यावेळी जाहीर केले. ‘आमराईत बसून विकास होत नसतो’ असा आमच्यावर आरोप करणारे आमदार मुरकुटे वनविभागाच्या ‘काष्ट कुटीत’ बसून कोणाचा विकास साधत असतात? असं टोला गडाख यांनी लगावला. गडाखांवर बेछूट आरोप करण्यापेक्षा आमदार मुरकुटे पाटपाणी आदी शेतकऱ्यांच्या प्रश्नावर मात्र बोलण्याचे टाळतात, याकडे उपस्थितांचे लक्ष वेधले.

जिल्ह्यातील विखे, तनपुरे, पाचपुते, कोल्हे, गडाख या नेत्यांनी राजकारणात हयात घातल्यानंतर बंगले बांधल्याचा इतिहास त्यांनी समोर आणला. या नेत्यांनी सामाजिक कामांसह रचनात्मक कामांच्या माध्यमातून हजारो, लाखो लोकांचे प्रपंच उभे करण्याला प्रथम प्राधान्य दिले. आमदार मुरकुटे यांनी मात्र सत्तेच्या अवघ्या दीड वर्षांच्या अल्प कालावधीत स्वतःचा सर्व सुखसोयींनी युक्त आलिशान बंगला बांधण्यास प्राधान्य दिल्याकडे गडाख यांनी उपस्थितांचे लक्ष वेधले. तालुक्याचे सोडा देवगावात एखाद्याचा प्रपंच उभा केल्याचे एक तरी उदाहरण दाखविण्याचे आव्हान त्यांनी आमदार मुरकुटे यांना दिले. मोदी आणि भाजपचे नाव घेऊन तरुणांना नादी लावण्याचा पोकळ उद्योग मात्र त्यांना चांगलाच जमत असल्याची खिल्ली त्यांनी उडवली.

कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक भगवानराव भगत यांनी केले. यावेळी ताराचंद ठोंबरे, अश्रूबा सानप, नागेश आघाव, सौंदळ्याचे सरपंच शरद आरगडे, भाऊसाहेब वाघ यांनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमास ‘मुळा’चे अध्यक्ष नानासाहेब तुवर, उपाध्यक्ष भाऊसाहेब मोटे, गोरक्षनाथ निकम, बाळासाहेब निकम, नंदकुमार पाटील, जिल्हा परिषद सदस्य तुकाराम शेंडे, बाळासाहेब लिंगायत, भाऊराव निकम, डॉ.रावसाहेब फुलारी आदींसह मोठा जनसमुदाय उपस्थित होता.

प्रारंभी भेंड्यातून देवगावला भव्य मोटार सायकल रॅलीने आगमन झालेल्या गडाख यांची गावातून सवाद्य मिरवणूक काढण्यात येऊन ग्रामस्थांच्या वतीने ठिकठिकाणी त्यांचे उत्स्फूर्त स्वागत करण्यात आले.


आमदार मुरकुटेनी केसाने गळा कापला-शरद आरगडे
मागील निवडणुकीत आमदार मुरकुटे यांना भक्कम साथ देणाऱ्या सौंदळ्याचे सरपंच शरद आरगडे, तसेच नागेश आघाव, भाऊसाहेब वाघ यांनी त्यांच्यावर केसाने गळा कापल्याचा आरोप केला.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post
DNALive24 Marathi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates