नगरच्या मद्यधुंद तरुणीचा पुण्यात राडा; पोलिसालाच चोपले


वेब टीम : पुणे
मद्यधुंद अवस्थेत रस्त्यावर आरडाओरडा करुन गोंधळ घालणार्‍या 30 वर्षीय तरुणीस समजावण्याचा प्रयत्न करणार्‍या महिला पोलिस कर्मचार्‍यास तरुणीने लाथाबुक्क्यांनी मारहाण करुन शिवीगाळ केल्याची घटना बुधवारी (दि.5) पहाटे 2 वाजेच्या सुमारास ज्ञानेश्‍वर पादुका चौक ते शिवाजीनगर पोलिस ठाण्यादरम्यान घडली.

पुणे येथील ज्ञानेश्वर पादुका चौक शिवाजीनगर पोलिस ठाणे रोडवर एक तरुणी दारुच्या नशेत गोंधळ घालीत असल्याची माहिती पोलिसांना फोनवरुन मिळाली.

त्यावरुन महिला पोलिस कर्मचारी पुजा हरिदास सारसर (वय 27) ही पोलिसांसह घटनास्थळी गेली असता त्यांना एक मुलगी दारुच्या नशेत मोठमोठ्याने ओरडुन गोंधळ घालत असल्याचे दिसले.

महिला पोलिस पुजा सारसर यांनी व त्यांच्या सहकार्‍यांनी त्या तरुणीस समजावण्याचा प्रयत्न केला असता तिने महिला पोलिस कर्मचार्‍यास शिवीगाळ करत धक्काबुक्की करुन लाथाबुक्क्यांनी मारहाण केली.

पोलिसांनी तिला ताब्यात घेऊन पोलिस ठाण्यात अधिक चौकशी केली असता तिचे नाव सोनल सुनिल सद्रे (वय 30, रा.सद्रेवाडा, भराडगल्ली, अहमदनगर) असे समजले.

याप्रकरणी शिवाजीनगर पोलिसांनी महिला पोलिस पुजा सारसर यांच्या फिर्यादीवरुन भादविक 353, 323, 504, 506, दारुबंदी कायद्यान्वये गुन्ह्याची नोंद केली असून अधिक तपास महिला पोलिस उपनिरीक्षक झडपे या करीत आहेत.

सोनल सद्रे हिस अटक करुन न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने तिला 1 दिवस पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post