विराट- रोहित मधील वाद; काय म्हणाले प्रशिक्षक शास्त्री...


वेब टीम : दिल्ली
भारतीय क्रिकेट संघ नुकत्याच झालेल्या विश्वचषक स्पर्धेतून उपांत्य सामन्यात बाहेर पडला. यानंतर कर्णधार विराट कोहली व उपकर्णधार रोहित शर्मा यांच्यात मतभेद असल्याच्या बातम्या येत होत्या. विराटने मात्र कोणतेही मतभेद नसल्याचे स्पष्ट केले होते.

आता भारतीय संघाचे प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी या वादावर प्रतिक्रिया दिली आहे. शास्त्री म्हणाले की, ‘मी या मतभेदाच्या बातम्यांना कंटाळलो आहे. या दोघांमध्ये मतभेद असते तर भारतीय संघाने चांगली कामगिरी केली नसती आणि दोघांनाही अलीकडच्या मालिकांमध्ये मुक्तपणे धावा करता आल्या नसता.’

‘मी गेल्या पाच वर्षांपासून ड्रेसिंग रूमच्या आसपास आहे. खेळाडू कसे खेळत आहेत आणि संघाला कसे पूरक आहेत याची मला माहिती आहे. त्यांची नीतिमत्ताही मी पाहिली आहे. संघात फूट पडल्याचा अहवाल हा मूर्खपणा आहे. मी तिथे त्यांच्याबरोबरच होतो आणि मला त्यांची खेळायची पद्धत माहित आहे.

जर मतभेद असते तर रोहितला विश्वचषकात पाच शतके करता आली असती का? विराट संघासाठी जे करत आहे ते का करेल? त्यांची एकत्र भागीदारी कशी असेल?’ असा सवालही त्यांनी केला आहे.

‘जेव्हा आपल्याकडे १५ खेळाडू असतात तेव्हा नेहमीच वेगवेगळी मते येतात आणि ती येण्याची गरज आहे. प्रत्येकाने एकाच मार्गाने विचार करणे मला पटत नाही. तुमचा निर्णय झाला असेल आणि कदाचित त्यानंतर कोणी नवीन रणनीतीचा पर्याय दिला तर त्याला प्रोत्साहित करणे महत्त्वाचे आहे.

कधी संघातील कनिष्ठ खेळाडूही आपण विचारही केला नव्हता अशी रणनीती समोर आणू शकतो त्यामुळे ती विचारात घेणे गरजेचे आहे. या सगळ्याकडे संघर्ष म्हणून पाहिले जाऊ नये.’ असेही शास्त्री म्हणाले.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post