सत्यजित तांबे पुन्हा नगर शहरातून विधानसभा लढणार?


वेब टीम : अहमदनगर
दक्षिण नगर जिल्ह्यामध्ये काँग्रेस पक्षाचे अस्तित्व कायम राखण्यासाठी नगर शहर विधानसभा मतदार संघाची जागा काँग्रेसच्या वाट्याला घेण्यात यावी तसेच उमेदवारीसाठी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सत्यजित तांबे व दीप चव्हाण यांच्या नावाचा विचार व्हावा अशी मागणी शहर काँग्रेस कमिटीच्यावतीने प्रदेश कार्यालयाकडे करण्यात आली आहे.

विधानसभा निवडणूक जाहिर झाली असून ही निवडणूक काँग्रेस व राष्ट्रवादी आणि मित्रपक्ष महाआघाडी करुन लढविणार आहेत. आघाडीच्या जागावाटपात यापुर्वी काँग्रेसच्या वाट्याला असलेल्या कर्जत जामखेड व श्रीगोंदा या दोन मतदारसंघांमध्ये बदल करुन हे मतदारसंघ राष्ट्रवादी काँग्रेंसच्या वाट्याला देण्याची मागणी राष्ट्रवादी काँग्रेसने केलेली आहे.

तसेच कर्जत जामखेडमधून राष्ट्रवादीचे रोहित पवार व श्रीगोंद्यातून राष्ट्रवादीचेच विद्यमान आ.राहुल जगताप यांनी निवडणुकीची तयारीही सुरु केलेली आहे. त्यामुळे दोन्ही मतदारसंघ राष्ट्रवादीच्या वाट्याला जाण्याची शक्यता बळावली आहे. नगर दक्षिण जिल्ह्यात काँग्रेस पक्षाचे अस्तित्व राखण्यासाठी किमान नगर शहर मतदारसंघाची जागा तरी काँग्रेस पक्षाकडे घेण्यात यावी अशी आग्रही मागणी काँग्रेसच्या शहरातील पदाधिकार्‍यांनी प्रदेशच्या नेत्यांकडे केली आहे.

तसेच सदर जागेसाठी संभाव्य उमेदवार म्हणून युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सत्यजित तांबे किंवा पक्षाचे प्रभारी शहराध्यक्ष दिप चव्हाण यांच्या नावाचा विचार व्हावा अशी मागणीही या पदाधिकार्‍यांनी केली आहे.

विधानसभा निवडणुकीनंतर संभाव्य जिल्हाविभाजनाच्या शक्यतेमुळे दक्षिण जिल्ह्यात काँग्रेसचे अस्तित्व कायम राखण्यासाठी ही मागणी करण्यात आल्याचे काँग्रेसच्या पदाधिकार्‍यांकडून सांगण्यात आले.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post