सिंधुदुर्गात राणेंच्या अस्तित्वाची तर केसरकरांच्या वर्चस्वाची लढाई


वेब टीम : सिंधुदुर्ग
जिल्ह्यात कणकवली, कुडाळ आणि सावंतवाडी अशा तीन विधानसभा मतदारसंघात ही रस्सीखेच होणार असून संपूर्ण कोकणचे लक्ष या निवडणुकीकडे लागून राहिले आहे.

महाराष्ट्राच्या राजकीय पटलावर सिंधुदुर्ग हा नारायण राणे यांचा गड मानला जात असला तरी काळानुसार पुलाखालून बरेच पाणी वाहून गेले आहे. ज्या जिल्ह्याच्या जनाधारावर नारायण राणे यांनी एकेकाळी महाराष्ट्राचे मुख्यमंत्रीपद भूषविले तेथेच पराभव पाहण्याची नामुष्कीदेखील राणेंवर ओढवली.

संदेश पारकर, राजन तेली यांच्यासारखे एकेकाळचे कट्टर राणे समर्थक आता राणेंच्या विरोधात शड्डू ठोकून उभे राहिल्याने नारायण राणेंसाठी यावेळची लढाई अस्तित्वाची ठरणार आहे. अन्यथा राणेंना पुन्हा एकदा भाजपच्या मेहरबानीवर आशा ठेवून रहावे लागणार आहे.

अर्थात, ज्या सोयीस्कररित्या भाजपने राणेंना कुंपणावर ठेवले आहे ते पहाता नारायण राणे यांचे राजकीय अस्तित्व संपल्यात जमा आहे. राणे यांच्या सुपुत्रांपैकी निलेश राणे यांनी लोकसभा निवडणुकीत नुकताच जबरदस्त पराभव चाखला आहे.

या निवडणुकीत तरी रत्नागिरी सिंधुदुर्गच्या मतदारांनी राणे यांच्या राजकीय अजेंड्याला सपशेल नाकारले आहे. राणेंचे दुसरे पुत्र नितेश राणे हे स्वाभिमान पक्षाचे आमदार असले आणि त्यांनी कणकवली मतदारसंघात बऱ्यापैकी काम केलेले असले तरी स्वाभिमान पक्षाच्या अस्तित्वाबद्दल सिंधुदुर्ग जिल्ह्यातील जनतेत संभ्रम आहे.

किंबहुना नारायण राणे यांच्या भाजप प्रवेशासोबत कोणत्याही क्षणी स्वाभिमान पक्ष गाशा गुंडाळू शकतो याची सिंधुदुर्गवासियांना खात्री असल्याने ते नितेश राणेंच्या नेतृत्वावर कितपत विश्वास ठेवतील ही शंका आहे.

विधानसभा निवडणुकीत युती झाली तर सावंतवाडी व कुडाळ मतदारसंघ सेनेकडे जातील तर कणकवली भाजपाकडे! या मतदारसंघात विद्यमान आमदार नितेश राणे यांना माजी आमदार प्रमोद जठर, कोकण सिंचन महामंडळाचे माजी उपाध्यक्ष संदेश पारकर यांचा सामना करावा लागण्याची शक्यता आहे.

विधानसभा निवडणूक माजी मुख्यमंत्री खासदार नारायण राणे यांच्यासाठी अस्तित्वाची लढाई तर गृहराज्यमंत्री दीपक केसरकर यांच्यासाठी वर्चस्वाची संधी असल्याने  ही निवडणूक सर्वाधिक चुरशीची ठरणार आहे.

२०१९ ची विधानसभा निवडणूक माजी मुख्यमंत्री खासदार नारायण राणे यांच्यासाठी अस्तित्वाची लढाई तर गृहराज्यमंत्री दीपक केसरकर यांच्यासाठी वर्चस्वाची संधी असल्याने  ही निवडणूक सर्वाधिक चुरशीची ठरणार आहे.

विधानसभेत सलग सहा वेळा एकापेक्षा अधिक मताधिक्याने विजयी ठरलेले नारायण राणे यांना पराभवाची धूळ चाटवणारे शिवसेनेचे वैभव नाईक जायंट किलर तर ठरलेच शिवाय राणेंच्या साम्राज्यात डळमळीत झालेल्या जनतेचा विश्वास संपादन करण्यात त्यांनी गेल्या काही कालावधीत यश मिळवले आहे.

त्यामुळे कुडाळ मतदारसंघात आजच्या घडीला शिवसेनेचे वर्चस्व आहे. कुडाळ मतदारसंघातून शिवसेनेची उमेदवारी वैभव नाईक यांना असणार हे निश्चित आहे. मुंबईत वाढलेल्या शिवसेनेची पाळेमुळे तळकोकणात, अधिक करून सिंधुदुर्गात असल्याने निवडणुकीत शिवसेनेला त्याचा वट्ट फायदा होतो.

मुंबईतील शिवसैनिक चाकरमानी कोकणातील निवडणुकीत प्रचाराच्या निमित्ताने मोठा वाटा उचलतात ज्याचा फायदा सेनेला मतपेटीतून मिळतो. त्यामुळे सध्याच्या अस्थिर परिस्थितीत नारायण राणे कुडाळ मतदारसंघातून निवडणूक लढवतात की इतरांना संधी देतात हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल.

सावंतवाडी मतदारसंघ हा शिवसेनेचे गृहराज्यमंत्री दीपक केसरकर यांचा बालेकिल्ला आहे. विधानसभा निवडणुकीत सेना भाजप युती न झाल्यास  याठिकाणी केसरकर यांना भाजपाचे राजन तेली यांचा सामना करावा लागणार आहे.

तथापि, दीपक केसरकर आणि नारायण राणे यांच्यातील ‘टशन’ जगजाहीर असल्यामुळे २०१९ ची सिंधुदुर्ग जिल्ह्याची विधानसभा निवडणूक म्हणजे राणे केसरकर लढाईचा पुढचा अंक ठरणार आहे

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post