उदयनराजे अखेर भाजपात डेरेदाखल


वेब टीम : दिल्ली
विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर खासदार उदयनराजे भोसले यांनी शनिवारी आपल्या कार्यकर्त्यांसह भाजपामध्ये प्रवेश केला.

अमित शाह, जे. पी.नड्डा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, चंद्रकांत पाटील, रामदास आठवले, गिरीश महाजन यांच्या उपस्थितीत त्यांनी कमळ हाती घेतलं. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि खासदार उदयनराजे भोसले यांनी शुक्रवारी मध्यरात्री आपल्या खासदारकीचा राजीनामा दिला.

लोकसभेचे सभापती ओम बिर्ला यांच्याकडे त्यांनी आपला राजीनामा सुपूर्द केला होता. यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसला मोठा धक्का मानला जात आहे.

“छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज भाजपासोबत आले आहेत. भाजपाच्या कोट्यवधी कार्यकर्त्यांकडून त्यांचं स्वागत करतो. त्यांनी आज तीन महिन्यातच खासदारकीचा राजीनामा देऊन भाजपात प्रवेश केला.

भाजपा पूर्वीपासून छत्रपतींच्या विचारातून प्रेरणा घेऊन पुढे जाण्याचा प्रयत्न करत आहोत. लोकसभेपेक्षाही विधानसभेत आणखी मोठा विजय मिळेल,” असं केंद्रीय गृहमंत्री अमित शाह म्हणाले. “2014 मध्ये महाराष्ट्राची जनता मनाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी जोडली गेली होती.

2019 मध्येही महाराष्ट्राच्या जनतेने याची प्रचिती दिली. विधानसभेतही मोठं यश मिळेल. उदयनराजेंच्या प्रवेशान सर्व खुष आहेत,” असंही त्यांनी नमूद केलं.

“छत्रपती शिवाजी महाराजांच्या घराण्याचं नाव ज्यांनी मोठं केलं असे उदयनराज यांनी भाजपात प्रवेश करण्याचा निर्णय घेतला ही अभिमानास्पद बाब आहे. काश्मीरमधून कलम 370 हटवण्याचा निर्णय घेतला तेव्हाही उदयनराजेंनी मोदींची साथ दिली होती.

उदयनराजे लोकांमध्ये राहणारे नेते आहेत. ते राजे जरी असले तरी लोकशाहीवर विश्वास ठेवून आहेत. जनतेत काम करत असल्यानं युवकांचं त्यांच्यावर मोठं प्रेम आहे. त्यांच्या येण्यानं भाजपाची ताकद वाढली आहे,” असं मत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी व्यक्त केलं.

तसंच यावेळी चंद्रकांत पाटील यांनीदेखील आपलं मत व्यक्त केलं. “उदयनराजे हे छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज आहेत. तसंच ते साताऱ्याचं नेतृत्व करत आहेत.

त्यांचे गेल्या अनेक वर्षांपासून ते अन्य पक्षाशी जोडलेले असले तरी भाजपाशी उत्तम संबंध आहेत,” असं प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यावेळी म्हणाले.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post