विकास मंडळाची 'ती' सभा बेकायदेशीर ; धर्मादाय आयुक्तांकडे तक्रार


वेब टीम : अहमदनगर
जिल्हा प्राथमिक शिक्षक विकास मंडळाची वार्षिक सर्वसाधारण सभा मंगळवारी (दि. 10) होत आहे. सदर सभेची नोटीस व अहवाल सभासदांना वेळेत न देता बेकायदेशीर रित्या सभा घेण्याचा घाट विकास मंडळ विश्वस्तांनी घातला आहे. असा आरोप करीत याबाबत शिक्षक समन्वय समितीच्या वतीने धर्मादाय आयुक्तांकडे तक्रार करण्यात आली आहे.

या तक्रार अर्जात म्हंटले आहे की, रावसाहेब रोहोकले यांचे व्यक्तिगत स्वार्थासाठी, स्वतःचे अस्तित्व टिकवण्यासाठी ही सभा सर्वसामान्य सभासदांना अंधारात ठेवून घेतली जात आहे. या सभेत फक्त अंधभक्त आणि हितचिंतकांना बोलावले आहे. त्यांनाच फोनद्वारे निरोप गेले आहेत. वार्षिक सभेची नोटीस 5 तारखेस एका वर्तमानपत्रात प्रसिद्ध केली आहे. वास्तविक पाहता ती सभासदांना 14 दिवस अगोदर मिळावयास हवी होती, म्हणून ती नियमानुसार नाही. सदर सभा ही सर्व सभासदांची आहे. यामध्ये कोणत्याही संघटनेचा संबंध नसताना या ठिकाणी रोहकले प्रणित संघटनेचा मेळावा होणार आहे. त्यामुळे या सर्व बाबींचा विचार करून समन्वय समितीने सदर सभा बेकायदेशीर ठरविण्यात यावी व त्यामधील झालेले कोणतेही ठराव मंजूर करू नये अशी मागणी धर्मादाय आयुक्तांकडे केली आहे.

सदर निवेदनावर संजय कळमकर, आबासाहेब जगताप, बापूसाहेब तांबे, संजय धामणे, कैलास चिंधे, संतोष दुसुंगे, नवनाथ तोडमल, बाळासाहेब कदम, आबा लोंढे, राजेंद्र निमसे, राजेंद्र ठोकळ, सचिन नाबगे, साहेबराव अनाप, निळकंठ घायतडक, एकनाथ व्यवहारे, के.आर.ढवळे, सिताराम सावंत, सुदर्शन शिंदे, राजेंद्र शिंदे, रविंद्र पिंपळे, बाळासाहेब चाबुकस्वार, भागवत लेंडे, नवनाथ अडसुळ, नारायण पिसे, सय्यद अली यांच्या सह्या आहेत.

स्वतःला अण्णा हजारे म्हणवणाऱ्या पारदर्शी नेत्याने विकास मंडळाची सभा जिल्ह्यातील सभासदांना अंधारात ठेऊन घेणे म्हणजे हुकुमशाहीचा कळस म्हणावे लागेल. अशी टीका राज्य प्राथमिक शिक्षक संघाचे विभागीय अध्यक्ष आबासाहेब जगताप यांनी केली आहे.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post