व्हॉट्सअ‍ॅपद्वारे केले उपचार; रुग्ण दगावला


वेब टीम : पुणे
हृदयरोग तज्ज्ञ नसतानाही हृदयविकाराचा झटका आलेल्या रूग्णावर दुसर्‍या डॉक्टरने व्हॉट्सअ‍ॅपच्या माध्यमातून दिलेल्या सल्ल्यावरून उपचार केल्यामुळे रूग्ण दगावल्याचा प्रकार समोर आला आहे.

नर्‍हे येथील आधार मल्टिस्पेशालिटी हॉस्पीटल येथे 21 जुलै 2018 रोजी हा प्रकार घडला होता. याप्रकरणी, सिंहगड पोलिस ठाण्यात चुकीचे उपचार केल्याप्रकरणी आठ डॉक्टर, रूग्णालयाचे संचालक आणि रूग्णालय उभारणीसाठी बेकायदा परवाना दिल्याबद्दल जिल्हा परिषदेचे जिल्हा आरोग्य अधिकारी अशा पंधरा जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

गणेश तात्याबा गोरे (नर्‍हे) असे मृत व्यक्तीचे नाव आहे. याप्रकऱणी काशीनाथ सौदागर तळेकर यांनी फिर्याद दिली आहे. तळेकर यांचे मेहुणे गणेश गोरे यांना 21 जुलै 2018 रोजी सायंकाळी हृदयविकाराचा झटका आला होता. तेव्हा कुटुंबातील सदस्यांनी गोरे यांना तत्काळ जवळच्या आधार मल्टिस्पेशालिटी हॉस्पीटल येथे दाखल केले.

तेव्हा आयुर्वेद डॉक्टर सलमान पठाण यांनी हृदयरोग तज्ज्ञ नसूनही गोरे यांच्यावर उपचार सुरू केले. गोरे यांची प्रकृती ढासळत असल्याचे लक्षात येताच, ईसीजी काढून डॉ. मोेहन लकडे व्हॉट्सअ‍ॅपद्वारे पाठवले. त्यावरून डॉ. लकडे यांच्या सूचनेनुसार तीन तास उशिरा इलॅक्झीन 30 हे इंजेक्शन दिले.

त्यानंतर डॉ. तेजस्विनी वाघमारे यादेखील हृदयरोगतज्ज्ञ नसूनही गोरे यांना रूग्णवाहिकेत घेऊन गेल्या व काही वेळाने परत आल्या. दरम्यान, गोेरे यांना उपचार न मिळाल्यामुळे डॉ. पठाण, डॉ.शहा, डॉ. शिंदे यांच्या हलगर्जीपणामुळे मृत्यू झाल्याचा ठपका त्यांच्यावर गोरेयांच्या कुटुंबीयांनी ठेवला.

त्याचप्रमाणे जागेच्या मूळ मालकांनी व रूग्णालय प्रशासनाने बनावट दस्ताऐवज तयार केले.

आरोपींनी दुय्यम निबंधक कार्यालयाकडे नोंदणी, पीएमआऱडीएची परवानगी, राष्ट्रीय इमारत नियमावलीनुसार बांधकाम आणि मेडीकल कौन्सिलकडे नोंदणी यातील कोणतीही प्रक्रिया पूर्ण केली नव्हती.

तसेच, तत्कालीन जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. दिलीप माने यांच्याशी संगनमत करून रूग्णालय उभारणीसाठी बेकायदा परवानगी दिल्याचे तपासात समोर आले आहे. सहायक पोलिस निरीक्षक चेतन थोरबोले पुढील तपास करत आहेत.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post