शिवसेनेकडून राठोडच; बाकीचे सगळे डमी उमेदवार?


वेब टीम : अहमदनगर
नगर शहर विधानसभा मतदारसंघातून शिवसेनेकडून माजी आमदार अनिल राठोड हे प्रबळ दावेदार मानले जातात. परंतु माजी महापौरांचे पती संभाजी कदम, अनिल शिंदे, माजी महापौर भगवान फुलसौंदर, नगरसेवक बाळासाहेब बोराटे हे शिवसेनेकडून इच्छुक असल्याची सध्या जोरदार चर्चा आहे. मात्र पक्षांतर्गत उमेदवारीची चर्चा करून, पक्षाबाहेरील इच्छुकांना अस्वस्थ करण्याचा डाव शिवसेनेकडून खेळण्यात आल्याचे समजते. त्यामुळे शिवसेनेकडून अनिल राठोड हेच विधानसभेचे उमेदवार राहणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

पक्षातूनच इतरांनी उमेदवारी मागितल्याने राठोड यांना मोठा धक्का मानला जात आहे. अनिल शिंदे व संभाजी कदम या दोघांनी मुंबईत जोरदार शक्तिप्रदर्शन करून विधानसभेची उमेदवारी मागितली. त्यामुळे शिवसेनेत फूट पडल्याचे वरकरणी दिसत असले तरी ही राठोड यांनीच खेळलेली एक चाल असल्याचे दिसून येते.

एक माजी महापौर व दोन माजी महापौरांच्या पतींनी महापौर म्हणून केलेल्या कामाचा लेखाजोखा मांडला. त्यामुळे आमदारकीची संधी दिल्यास शहरात मोठ्या प्रमाणावर विकास कामे केली जातील, असा दावा या तिघांकडून करण्यात आला आहे.

राठोड यांनी पंचवीस वर्षे आमदार म्हणून केलेले काम आणि संघटनेत दिलेले योगदान पक्षश्रेष्ठींसमोर सादर केले. शिंदे व कदम यांच्यासमवेत त्यांचे समर्थक मोठ्या संख्येने होते. राठोड यांच्यासमवेत महापालिकेतील काही नगरसेवक व कार्यकर्ते उपस्थित होते. शिंदे व कदम यांनी विधानसभा उमेदवारीवर प्रबळ दावेदारी केली आहे.

नुकतेच महाजानदेश यात्रेत स्वागत करण्यासाठी उभे असलेल्या राठोड यांना मुख्यमंत्री फडणवीस यांनी त्यांच्या रथावर बोलवून घेत सत्कार स्वीकारला. राठोड रथावर आल्याने भाजपातील अनेक जण अस्वस्थ झाले. मात्र राठोड व मुख्यमंत्र्यांची मैत्री यातून दिसल्याने अनेक जण थंड पडले आहेत.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post