घ्या जरा आदर्श; आमदाराने खड्डे दिसताच युवकांसोबत श्रमदान करत टाकले बुजवून


वेब टीम : अहमदनगर
पुणे-नाशिक राष्ट्रीय महामार्गावरील बोटा बाह्यवळण येथे परतीच्या मुसळधार पावसामुळे महामार्गावर ठिकठिकाणी मोठमोठे खड्डे पडले होते. त्यामुळे अनेक वाहने त्या खड्ड्यात आदळून वाहनांचे टायर फुटले होते.

परिसरातीलच काही तरुण एकत्र येत ते खड्डे बुजवित होते. परंतु रविवार दि. २७ ऑक्टोबर रोजी सकाळी अकोले तालुक्याचे नवनिर्वाचित आमदार किरण लहामटे हे बारामतीला जात असताना ते त्या ठिकाणी थांबून या तरुणांबरोबर त्यांनीही श्रमदान केले. त्यामुळे आमदार लहामटे यांना श्रमदान करताना पाहून सर्वच जण चकीत झाले होते..

पुणे-नाशिक राष्ट्रीय महामार्गावरील कऱ्हे घाट ते बोटा बाह्यवळण यादरम्यान परतीच्या भीज पावसामुळे महामार्गावर ठिकठिकाणी मोेठे खड्डे पडले आहेत.

त्यामुळे वाहनचालकांना वाहने चालविताना मोठी कसरत करावी लागत आहे, शुक्रवारी रात्री व शनिवारी सकाळी अनेक वाहनचालकांचे टायरही या खड्ड्यांमुळे फुटल्याने वाहनचालकांना मोठा त्रास सहन करावा लागला आहे.

या जीवघेण्या खड्ड्यांमुळे कोणाला जीव गमवावा लागू नये, म्हणून बोटा येथील असलम शेख, अमित शेळके, खंडू जाधव, सुनील कणसे, सुभाष शेळके, नवनाथ सरोदे, शुभम कुलकर्णी, प्रवीण वाकचौरे, विशाल कुरकुटे, दीपक हांडे, गणेश शेळके, विजय पानसरे, सौरभ शेळके, दिनेश निकम, पिंटू साळुंके या तरुणांनी हे खड्डे बुजविण्याचा निर्णय घेतला.

रविवारी सकाळी फावडे, घमेले आदी साहित्य घेऊन हे सर्व तरुण बाह्यवळण या ठिकाणी गेले आणि महामार्गावरील खड्ड्यांमध्ये माती टाकून हे खड्डे बुजविण्याचे काम करीत होते. त्याच दरम्यान आमदार किरण लहामटे हे अकोले येथून घारगावमार्गे बारामतीला चालले होते.

त्याचवेळी आ. लहामटे हे बोटा या ठिकाणी असलेल्या बाह्यवळणाजवळ आले. त्यावेळी त्यांना श्रमदान करताना तरुण दिसले. तेही गाडीतून खाली उतरले व हातामध्ये घमेले घेवून त्यांनीही त्या खड्ड्यांमध्ये माती टाकत श्रमदान केले.

यावेळी त्यांच्यासमवेत जिल्हा परिषदेचे कृषी व पशुसंवर्धन समितीचे सभापती अजय फटांगरे, बोटा गावचे सामाजिक कार्यकर्ते सुहास वाळुंज, ग्रामपंचायत सदस्य संतोष शेळके, राहुल कुरकुटे, संतोष आभाळे, अकलापूरचे उपसरपंच संदीप आभाळे, रमेश आहेर, राघू जाधव, रमेश डुंबरे आदी ग्रामस्थ उपस्थित होते.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post
DNALive24 Marathi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates