जिल्ह्यातील विद्यमान आमदारांसह विखे, पिचड, पाचपुतेंना भाजपची उमेदवारी जाहीर


वेब टीम : अहमदनगर
शिवसेना- भाजपाच्या युतीवर शिक्कामोर्तब झाल्यानंतर भाजपने आपल्या 125 उमेदवारांची पहिली यादी मंगळवारी जाहिर केली आहे.

या यादीत नगर जिल्ह्यातील सर्व विद्यमान आमदारांना उमेदवारी देतानाच भाजपामध्ये आलेल्या ना.राधाकृष्ण विखे पा. आणि वैभव पिचड यांना उमेदवारी जाहिर केली असून श्रीगोंदा मतदार संघातून माजी मंत्री बबनराव पाचपुते यांनाच पक्षाने मैदानात उतरवले आहे.

नगर जिल्ह्यात विधानसभेच्या एकुण 12 जागा असून यापैकी 8 जागा भाजप तर 4 जागा शिवसेना लढविणार असल्याचे या उमेदवारी यादीवरुन स्पष्ट होत आहे.

भाजपने दिल्लीतून जाहिर केलेल्या पहिल्या उमेदवारी यादीत राहुरीतून आ.शिवाजीराव कर्डिले, कर्जत – जामखेडमधून ना.प्रा.राम शिंदे, कोपरगावमधून आ.स्नेहलता कोल्हे, नेवासामधून आ.बाळासाहेब मुरकुटे, शेवगाव-पाथर्डीतून आ.मोनिका राजळे या विद्यमान आमदारांना भाजपने उमेदवारी जाहिर केली आहे.

तर काँग्रेसमधून भाजपमध्ये आलेल्या ना.राधाकृष्ण विखे पा.यांना शिर्डी तर राष्ट्रवादीतून आलेले आ.वैभव पिचड यांना अकोले मतदार संघातून भाजपने विधानसभेची उमेदवारी दिली आहे.

श्रीगोंदा मतदार संघातून भाजपच्या उमेदवारीबाबत संभ्रमाचे वातावरण होते. राष्ट्रवादीचे आ.राहुल जगताप आणि काँग्रेसचे नेते राजेंद्र नागवडे हे भाजपात प्रवेश करण्याची शक्यता वर्तविली जात होती.

त्यामुळे माजी मंत्री बबनराव पाचपुते यांच्या उमेदवारीचे काय होणार? असा प्रश्‍न कार्यकर्त्यांना पडला होता. मात्र यासर्व शक्यतांना पूर्णविराम देत भाजपने पाचपुते यांनाच पुन्हा निवडणूक रिंगणात उतरवले आहे.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post