कमी दाबाचा पट्टा सक्रिय : तीन दिवस राहणार पाऊस


वेब टीम : पुणे
मागील दोन दिवसांपासून शहरात मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस कोसळत होता. त्यामुळे शहर पुन्हा एकदा जलमय झाले आहे.

रस्त्यांवरून पाणी वाहत होते, तर चौकाचौकांत पाणी साचले होते. सकाळपासूनच महत्त्वाच्या रस्त्यांवर वाहतूक कोंडी होती.

अनेक चौकातील सिग्नल सलग दुसर्‍या दिवशीही बंद होते. संततधार पावसाचा रविवारीही विविध प्रकारच्या व्यवसायांना फटका बसला.

सोमवारी शहर आणि परिसरात मेघगर्जना व वीजांच्या कडकडाटासह पाऊस पडणार असल्याचा अंदाज पुणे वेधशाळेने वर्तवला आहे.

शनिवारी पहाटेपासूनच पावसाला सुरूवात झाली होती. त्यामुळे सकाळपासूनच लोकांना घराबाहेर पडता आले नाही. अनेकांना नियोजित कामे रद्द करावी लागली.

त्यामुळे सकाळी रस्त्यांवरील वाहनांची संख्याही मोठ्या प्रमाणात घटली होती. दहानंतर वाहनांची संख्या वाढल्याने ठिकठिकाणी वाहतूक कोंडीत भर पडत गेली.

रविवारी दुपारी थोडा वेळ पावसाने विश्रांती घेतली. पण त्यानंतर पावसावाची रिपरिप सुरू झाली.

राज्यासह देशातूनच मान्सून परतला असल्याची घोषणा हवामान विभागाने मागील आठवड्यात केली होती.

घोषणेच्या दुसर्‍या दिवशीच बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा सक्रीय झाल्याने संपूर्ण राज्यात पावसाचे पुनरागमन झाले आहे.

मागील 24 तासात शहरात 38 मि.मी. पावसाची नोंद झाली. लोहगाव येथे 25.6 तर पाषाण येथे 42.8 मि.मी. पावसाची नोंद झाली.

तर सकाळपासून सायंकाळी 5.30 वाजेपर्यंत शहरात 10.7 मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. कमाल आणि किमान तपमानात लक्षणीय घट झाली आहे.

येत्या बुधवारपर्यंत शहर आणि परिसरात मेघगर्जना व वीजांच्या कडकडाटासह पाऊस पडणार आहे. त्यानंतर मात्र पुढील काही दिवस शहरात ढगाळ वातावरण असणार आहे. अधुन-मधून पावसाच्या हलक्या सरी कोसळणार आहेत.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post