निवडणुकीनंतर रोहित पवार कुठंच दिसणार नाही : राम शिंदे


वेब टीम : अहमदनगर
उमेदवारी अर्ज दाखल करताना मतदारांची उत्स्फूर्त झालेली गर्दी व त्यानंतर सर्व समाजातून मिळणारा पाठिंबा, दौऱ्यात महिलांचा सहभाग, मुस्लिम समाज व युवकांचा ओढा यामुळे दिवसेंदिवस जनतेचे समर्थन वाढत आहे.

त्यामुळे मतदानानंतर रोहीत पवार मतदारसंघात दिसणार नाहीत, अशी खोचक टीका पालकमंत्री राम शिंदे यांनी केली.

जामखेड तालुक्यातील नान्नज येथील उरेवस्ती येथे पालकमंत्री राम शिंदे यांनी ग्रामस्थांशी संवाद साधला. त्यावेळी ते बोलत होते. शिंदे म्हणाले, मागील पाच वर्षांत मंत्रीपदाच्या काळात मोठ्या प्रमाणावर निधी आणला, त्यामुळे वीज, पाणी, रस्ते या मुलभूत समस्या सोडवल्या.

आता पुढील काळात शेतीला कायम पाणी मिळावे यासाठी कृष्णा भीमा स्थिरीकरण योजना राबवून तालुका दुष्काळमुक्त करणार आहे.

साखर कारखाना काढून शेतकऱ्यांना न्याय द्यायचा आहे. तसेच सूतगिरणी मंजूर करून नऊ कोटींचा निधी मिळवून दिला आहे. महिला आर्थिकदृष्ट्या सक्षम होतील याकरिता बचतगटांच्या माध्यमातून रोजगार उपलब्ध करून दिला जाणार आहे.

मतदारसंघात जनतेचा मिळणारा प्रतिसाद पाहता आता मतदारांनी ठरवले आहे आमदारला मत द्यायचे की नामदारला, असे ते म्हणाले. विरोधकांनी या मतदारसंघात काय विकासकामे केली हे सांगावे, असे आव्हानही त्यांनी दिले.

केवळ चॉकलेट, गोळ्या व पॅड वाटून मते मिळत नाहीत. येथील जनता अशा प्रलोभनांना बळी पडणार नाही, आपल्या कामावर जनतेचा विश्वास असल्याचे जनता दाखवून देईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

राम शिंदे यांनी नान्नज गावात जाऊन मतदारांशी प्रत्यक्ष भेट घेऊन चर्चा केली. तसेच मुस्लिम समाजाची बैठक युवा नेते अमजद पठाण यांनी घडवून आणली.

यावेळी त्यांनी मुस्लिम समाजाच्या मागण्या मांडल्या त्या सोडविण्याचे आश्वासन शिंदे यांनी दिले. यावेळी नान्नज सरपंच विद्याताई मोहळकर, माजी पंचायत समितीचे सभापती तुषार पवार, ग्रामपंचायत सदस्य सचिन मलंगनेर, आश्रू खोटे, भाजपा जिल्हा सरचिटणीस आजीनाथ हजारे, भाजपा तालुकाध्यक्ष रवींद्र सुरवसे, नगरसेवक महेश निमोणकर, तुकाराम मोहळकर आदी उपस्थित होते.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post