दुसऱ्या दिवशीच्या खेळावर भारताचे वर्चस्व


वेब टीम : रांची
रोहित शर्माचे दिमाखदार द्विशतक, अजिंक्य रहाणेचे शतक, रवींद्र जडेजाचे अर्धशतक तर उमेश यादवची फटकेबाजी यामुळे भारताने दुसऱ्या दिवसावर चांगलेच वर्चस्व ठेवले.

तिसऱ्या कसोटीच्या दुसऱ्या दिवशी भारतीय फलंदाजांनी ४९७ धावांचा डोंगर उभा केला. तर दिवसाच्या शेवटी अफ्रिकेचे दोन गडी बाद करत पाहुण्यांना झटकेही दिले.

दक्षिण अफ्रिकेविरुद्धच्या मालिकेतील अखेरची कसोटी रांचीच्या जेएससीए मैदानावर होत आहे. प्रथम फलंदाजी करताना भारतीय संघाने अफ्रिकन गोलंदाजांची चांगलीच धुलाई केली.

सलामीवीर रोहित शर्माने कालच्या शतकीय खेळीचे रूपांतर आपल्या पहिल्यावहिल्या द्विशतकात केले. त्याने २५५ चेंडूत २१२ धावा केल्या.

उपकर्णधार अजिंक्य रहाणेनेही १९२ चेंडूत शानदार ११५ धावा केल्या. अष्टपैलु खेळाडू रवींद्र जडेजानेही ५१ धावा करत मोलाचा वाटा उचलला.

उमेश यादवने अवघ्या १० चेंडूत ३१ धावा पटकावत धमाकेदार खेळी केली. भारताने ९ बाद ४९७ धावांवर डाव घोषित केला.

त्यानंतर फलंदाजीस आलेल्या अफ्रिकन सलामीवीरांना अवघ्या ८ धावांतच माघारी फिरावे लागले.

सलामीवीर डीन एल्गरला भोपळा फोडण्याच्या आधीच शमीने साहाकरवी झेलबाद केले. तर डी कॉक चार धावांवर असताना उमेश यादवने त्याचा अडसर दूर केला.

अंधुक प्रकाशामुळे दुसऱ्या दिवशीचा खेळ थांबला तेव्हा अफ्रिकेची अवस्था २ बाद ९ धावा अशी होती. अफ्रिका अजूनही ४८८ धावांनी पिछाडीवर आहे.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post