मुख्यमंत्री पदाबाबत भाजपने लेखी द्यावे : शिवसेनेची मागणी


वेब टीम : मुंबई
शिवसेनेच्या आमदारांची ’मातोश्री’वरील बैठक संपली असून मुख्यमंत्रिपदासाठी शिवसेनेने आक्रमक भूमिका घेतली आहे.

अडीच-अडीच वर्ष मुख्यमंत्रिपद आणि सत्तेत समान वाटा द्यावा, अशी मागणी शिवसेनेच्या आमदारांनी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे.

यामुळे ऐन दिवाळीत राज्यातील राजकीय वातावरण तापले आहे. भाजपकडून लेखी पत्र घेतल्याशिवाय पुढचा निर्णय घेऊ नये, अशीही मागणी शिवसेनेच्या आमदारांकडून करण्यात आली आहे.

दरम्यान, भाजप ठरल्याप्रमाणे वागली नाही तर इतर पर्याय खुले असल्याचे उद्धव ठाकरे आमदारांना संबोधित करताना म्हणाले.

तर दिवाळीनंतर भाजप-शिवसेनेच्या नेत्यांमध्ये बैठक होईल. यात फॉर्म्युला निश्चित केला जाईल, असे भाजपचे नेते रावसाहेब दानवे यांनी स्पष्ट केले.

लोकसभा निवडणुकीवेळी भाजपचे अध्यक्ष अमित शहा यांच्यासोबत बैठक झाली होती. यावेळी महाराष्ट्रात सत्तेत समान वाटा दिला जाईल, असे आश्वासन शहा यांनी दिले होते.

यामुळे मुख्यमंत्रिपद अडीच-अडीच वर्ष असावे, अशी मागणी शिवसेनेने केली आहे. सत्ता स्थापनेचे सर्वाधिकार आमदारांनी उद्धव ठाकरे यांना दिले आहेत, अशी माहिती आमदार प्रताप सरनाईक यांनी बैठकीनंतर दिली.

जवळपास एक तास शिवसेनेच्या नवनिर्वाचीत आमदारांची बैठक चालली. मुख्यमंत्रिपदात समान वाटा मिळेपर्यंत पुढील चर्चा नको, अशी भूमिका आता शिवसेनेने घेतली आहे.

दरम्यान, शिवसेना भाजपच्या नेत्यांमध्ये दिवाळीनंतर बैठक घेतली जाईल. या बैठकीत सत्ता स्थापनेवर चर्चा होईल आणि त्यात फॉर्म्युला ठरवला जाईल.

सत्तेत लहान भाऊ, मोठा भाऊ हे क्षमतेवरच ठरते. पण चर्चा करून निर्णय घेतला जाईल. प्रत्येक पक्षातील कार्यकर्त्यांच्या मागण्या असतात.

तशी मागणी शिवसेनेतूनही करण्यात आली आहे, असे भाजपचे नेते आणि खासदार रावसाहेब दानवे म्हणाले.

दरम्यान, ’मातोश्री’ येथे आदित्य ठाकरे पुढचे मुख्यमंत्री, असे पोस्टर्स कार्यकर्त्यांनी लावले आहेत. यामुळे भाजपवर शिवसेनेने दबाव वाढवला आहे.

दरम्यान, शिवसेना आणि राष्ट्रवादीचे नेते एकमेकांच्या संपर्कात असल्याचीही चर्चा आहे. यामुळे भाजपच्या गोटात काहीशी अस्वस्थता आहे.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post