शिवसेनेने सत्ता स्थापनेसाठी प्रस्ताव द्यावा, आम्ही तयारच : आमदार बाळासाहेब थोरात


वेब टीम : मुंबई
राज्यातल्या विधानसभा निवडणुकांचा निकाल जाहीर झाला आहे. सत्तेच्या चाव्या शिवसेनेच्या हाती गेल्याने सेना भाजपला साथ देत युतीधर्म पाळणार का राज्यात नवा पॅटर्न बघायला मिळणार याची चर्चा आहे.

त्यातच काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी, शिवसेनेसोबत सरकार स्थापन करण्याची आमची इच्छा आहे.

मात्र आमच्यासोबत सत्ता स्थापन करण्याची शिवसेनेने मानसिकता तयार करावी.

सेनेचा प्रस्ताव आल्यास त्यावर गंभीरपणे विचार करता येईल, असं सांगत सेनेला खुली ऑफर दिली आहे. ते मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलत होते.

त्यातच शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सेनेच्या सर्व आमदारांची मातोश्रीवर बैठक बोलवली असल्याने सेना काय निर्णय घेते याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.

अपेक्षित नसतानाही जनतेने आम्हाला चांगला कौल दिला आहे. मतदारांनी आम्हाला विरोधी पक्षात बसण्याचा कौल दिला असून आम्ही विरोधी पक्षात बसून जबाबदारीने काम करणार आहोत.

या निकालातून मतदारांनी भाजप, शिवसेनेच्या कारभारावर नाराजी व्यक्त केली आहे. खऱ्या अर्थाने हा जनतेने दिलेला सत्तेविरोधातील कौल आहे.

शिवसेनेकडून सत्ता स्थापण्यासाठीचा कोणताही प्रस्ताव आलेला नाही, परंतु त्यांच्यासोबत सत्ता स्थापन करण्यास आम्ही उत्सुक आहोत. प्रस्ताव आल्यावर यावर विचार करू.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post