नगर शहरात येणार तर भैय्याचं; 'या' भैय्याचे पारडे जड


वेब टीम : अहमदनगर
विधानसभा निवडणुकीसाठी मतदान प्रक्रिया पार पडल्यानंतर आता सर्वांच्याच नजरा 24 ऑक्टोबर रोजी होणार्‍या मतमोजणीकडे लागल्या आहेत. नगर शहर विधानसभा मतदार संघातून पुन्हा ‘भैय्या’ च बाजी मारणार असा दावा केला जात आहे. अनिल भैय्या व संग्राम भैय्या यांच्या लढतीत शिवसेनेच्या अनिल भैय्यांचे पारडे जड असल्याचे दिसून येते.

त्यामुळेच मागील सलग 30 वर्षापासून ‘भैय्या’ नावाशी जुळलेले हे समिकरण पुढील पाच वर्षेही कायम राहणार असल्याचे स्पष्ट दिसत आहे.

नगर शहर विधानसभा मतदार संघाच्या निवडणुकीत यावेळी अनेक उमेदवारांनी आपले नशीब अजमावले आहे. परंतु त्यात राष्ट्रवादी-काँग्रेस आघाडीचे उमेदवार आ. संग्राम जगताप आणि शिवसेना-भाजप युतीचे उमेदवार अनिल राठोड यांच्यातच खरी लढत रंगली आहे.

1990 पासून शिवसेनेच्या अनिल राठोड यांनी या मतदार संघाचे प्रतिनिधीत्व केले आहे. ते ‘भैय्या’ म्हणूनच शहरासह जिल्ह्यात परिचित झाले. परंतु 2014 च्या निवडणुकीत या ‘भैय्या’ चा 25 वर्षानंतर पराभव करत संग्रामभैय्या जगताप हे शहराचे आमदार झाले.

25 वर्षे आमदार राहिलेल्या भैय्याचा पराभव करत शहरातील जनतेने संग्राम जगताप यांच्या रूपाने पुन्हा भैय्यालाच निवडून दिले आहे.

आता 2019 च्या निवडणुकीत दोन्ही भैय्या एकमेकांसमोर पुन्हा एकदा उभे ठाकले असून या निवडणुकीतही भैय्याच बाजी मारणार असा दावा केला जात आहे. परंतु कोणते भैय्या बाजी मारणार? हे पाहण्यासाठी 24 ऑक्टोबरच्या निकालाची वाट पहावी लागणार आहे.

गेल्या निवडणुकीत राठोड यांना ४६ हजार, संग्राम जगताप यांना ४९ हजार, भाजपचे अभय आगरकर यांना ४० हजार तर सत्यजित तांबे यांना २० हजाराच्या आसपास मते मिळाली होती. आता युती व आघाडी झाली असल्याने राठोड यांचे पारडे जड मानले जात आहे.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post