गोपीचंद पडळकरांची 'हवा' संपली, डिपॉझिट जप्त; अजित पवारांची बाजी


वेब टीम : पुणे
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिष्ठेच्या केलेल्या बारामतीच्या जागेवर भाजपचे उमेदवार गोपीचंद पडळकर यांना पराभव स्वीकारावा लागला. याठिकाणी अजित पवारांनी तब्बल पावणे दोन लाख मतांनी पडळकर यांचा पराभव केला.


पवारांना आव्हान देणाऱ्या गोपीचंद पडळकर यांना स्वतःचे डिपॉझिटही वाचावीत आले नाही. त्यामुळे त्यांची 'हवा' आता संपल्यात जमा आहे. सांगली जिल्ह्यातील खानापूर मतदारसंघात पडळकरांनी आपली राजकीय कारकिर्द सुरू केली. 2009 मध्ये राष्ट्रीय समाज पक्षाकडून विधानसभेची निवडणूक लढवली.  2014 मध्ये ते भारतीय जनता पक्षाकडून लढले, त्यावेळी त्यांना तिसऱ्या क्रमांकाची मते मिळाली.

त्यानंतर पडळकरांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ताकद दिली होती. मात्र 2018 मध्ये पडळकरांनी धनगर आरक्षण मुद्यावरून भाजप विरोधात भुमिका घेतली. त्यासाठी राज्यभर दौरे केले, पण लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर भाजपशी जुळवून घेतले. भाजपच्या लोकसभा तिकीटासाठी त्यांनी प्रयत्न केले, मात्र तिकीट मिळाले नाही. मग त्यांनी वंचित बहुजन आघाडीशी संपर्क केला.

सांगली लोकसभेला पडळकर यांना 3 लाख मते मिळाली. वंचितच्या उमेदवारांत सर्वात जास्त मतदान पडळकरांना मिळाले. खुद्द प्रकाश आंबेडकरांपेक्षा जास्त मते पडळकरांना मिळाली. त्यामुळे पडळकर राज्यात चर्चेत आले होते.

विधानसभेच्या पार्श्वभूमीवर पडळकर हे पुन्हा भाजपात गेले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पडळकरांचे जोरदार मार्केटिंग केले. बारामती जिंकण्यासाठी त्यांना तिथे पाठवत असल्याचे जाहीर केले. त्यानंतर भाजपने रितसर उमेदवारी जाहीर केली.

मात्र पडळकर बारामतीत साधी लढतही देवू शकले नाहीत. पडळकरांचे डिपॉझिट जप्त झाले आहे. त्यांना 30 हजार मते मिळाली आहेत. डिपॉझिट वाचवण्यासाठी त्यांना अजून 10 हजार मते मिळायला हवी होती. 

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post