हॉटेलमधून चालवायचे ऑनलाईन सेक्स रॅकेट; पोलिसांनी केला टोळीचा पर्दाफाश


वेब टीम : मुंबई
अंधेरीतील एका हॉटेलमधून ऑनलाईन सेक्स रॅकेट चालवणाऱ्या टोळीचा क्राईम ब्रँचच्या युनिट-१० ने पर्दाफाश केला आहे. या प्रकरणी क्राईम ब्रँचने हॉटेलचा भागीदार गुल्ली ऊर्फ भोला ऊर्फ करण यादव आणि त्याचे दोन सहकारी संतोष व्ही. यादव आणि अशोक यादव यांना अटक करण्यात आली आहे.

अटकेनंतर या तिघांनाही स्थानिक महानगर दंडाधिकारी न्यायालयाने शुक्रवार, ४ ऑक्टोबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. या गुन्ह्यांत अमर यादव हा आरोपी फरार असून त्याच्या अटकेसाठी आता पोलिसांनी शोधमोहीम सुरू केली आहे..

क्राईम ब्रँचच्या अधिकाऱ्यांच्या तपास करत असताना काही मोबाईल क्रमांक तसेच आक्षेपार्ह मजकूर वाचण्यात आले होते. त्यात मुंबई एस्कोर्ट, व्हीआयपी सेलिब्रेटी, हॉट जीएफ असे सांकेतिक शब्दांचा वापर करून काही टोळ्या सेक्स रॅकेट चालवत असल्याचे समजले होते.

या माहितीची शहानिशा करण्यासाठी या पथकाने संबंधित व्यक्तीला फोन करून त्याच्याकडे काही तरुणींची मागणी केली होती. सर्व सौदा पक्का होताच या व्यक्तीने बोगस गिऱ्हाईकाला अंधेरी पूर्वेकडील जे. बी. नगर मेट्रो स्टेशनजवळील शहीद भगतसिंग कॉलनी, आखून हॉटेल रॉयल इलाईटमध्ये बोलावले होते.

त्यानंतर पोलीस पथकाने तिथे साध्या वेशात पाळत ठेवून या तिन्ही आरोपींना अटक केली. त्यांच्याकडून पोलिसांनी आठ मोबाईल फोन, आठ सिमकार्ड, सोळा हजार रुपयांची कॅश हस्तगत केली आहे. या कारवाईत पोलिसांनी दोन तरुणींची सुटका केली असून त्यांना महिला सुधारगृहात पाठवले आहे. पोलीस तपासात करण आणि अमर यादव हे दोघेही संबंधित हॉटेल चालवत असून त्यांची हॉटेलमध्ये भागीदारी होती.

ते दोघेही इंटरनेटच्या मदतीने या ठिकाणी सेक्स रॅकेट चालवत होते. त्यासाठी ते काही भारतीयांसह विदेशी तरुणींच्या संपर्कात होते. मागणीनुसार त्यांना हॉटेलमध्ये बोलावून ग्राहकांसोबत रूममध्ये पाठविले जाई. या तरुणींना मिळणाऱ्या रकमेतून त्यांना ५० टक्क्यांचे कमिशन मिळत होते.

ऑनलाईन संपर्क साधणाऱ्या ग्राहकांना ही टोळी थेट बँकेच्या खात्यात पैसे जमा करण्यास सांगत होती. करण आणि अमर हे दोघेही या टोळीचे मुख्य आरोपी असून काही वर्षांपासून या हॉटेलमध्ये सेक्स रॅकेट चालत असल्याचे तपासात उघडकीस आले आहे. यातील मुख्य आरोपीविरुद्ध पवई, दहिसर समाजसेवा शाखेत अशाच काही गुन्ह्याची नोंद झाली आहे.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post