भरधाव वेगात येणारा केमिकलचा टँकर पलटून अपघात


वेब टीम : अहमदनगर
दौंडकडून भरधाव वेगात नगरकडे येणार्‍या केमिकलच्या टँकरने रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या टेम्पोला जोराची धडक दिल्याने झालेल्या अपघातात दोन्ही वाहने रस्त्याचा खाली उतरुन पलटी झाली. ही घटना गुरुवारी (दि.28) पहाटे 4.30 च्या सुमारास व्हिआरडीई जवळ घडली.

याबाबतची अधिक माहिती अशी की, भिगवनहून जळगावकडे नगरमार्गे जाणार्‍या आयशर टेम्पो (क्र.एम.एच.19, झेड 3028) च्या डिझेल टाकीतून डिझेल लिकेज होत असल्याचे टेम्पो चालक अजय संतोष कोळी (रा.जळगाव) याच्या निदर्शनास आले.

 पुढे जावून गाडीला मोठा प्रॉब्लेम होऊ नये म्हणून त्याने व्हीआरडीई जवळ रस्त्याच्या कडेला टेम्पो उभा केला. पहाटेच्या सुमारास नगर दौंड रोडने निर्‍हे ते वाळुंज (औरंगाबाद) कडे इथेनॉल केमिकल घेऊन टँकर (एन.एच.04, ई.बी. 2601) जात होता.

 व्हिआरडीई जवळ आल्यावर चालकाचे टँकर वरील नियंत्रण सुटल्याने आयशर टेम्पोच्या मागील बाजूस जोराने धडकला. धडक इतकी भीषण होती की या धडकेत आयशर टेम्पो व टँकर फुटपाथवर चढून रस्त्याच्या खाली गेले. व तेथे इथेनॉल केमिकलचा टँकर पलटी झाला.

ही घटना घडताच आजुबाजुचे नागरिक अरणगाव येथील सामाजिक कार्यकर्ते गोरख कल्हापुरे हे तातडीने घटनास्थळी पाहोचले व त्यांनी टेम्पो चालक व कंटेनर चालक यांना बाहेर काढून मदत केली. टेम्पोचे केबिन उघडल्या गेल्याने टेम्पो चालक अजय कोळी हा बाहेर फेकला गेल्याने बचावला.

 टँकर मधून इथेनॉल केमिकलची गळती सुरू होताच परिसरात उग्र वास सुरू झाला. आजुबाजुच्या नागरिकांनी या घटनेची माहिती नगर तालुका पोलिसांनी व अग्नीशामन दलास तातडीने कळविले. या घटनेची माहिती मिळताच नगर तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक धनराज जारवाल पोलीस पथकासह घटनास्थळी पोहोचले.

त्या पाठोपाठ महामार्ग पोलीस व शहर वाहतूक नियंत्रण शाखेचे पोलीस निरीक्षक अविनाश मोरे हे पोलीस पथकासह घटनास्थळी पोहोचले. त्यांनी खबरदारीचा उपाय म्हणून रस्त्यावरील वाहतूक थांबवली. यावेळी एमआयडीसी येथील सनफार्मा कंपनीचे केमिकल तज्ज्ञ हरिदास सिंग व श्री. कुलथे यांना माहिती देवून बोलविले.

 त्यांनी खबरदारीचा उपाय म्हणून त्या परिसरातील विद्युत पुरवठा तात्काळ बंद केला. अग्नीशामक दलाच्या आरिफ इनामदार, अशोक काळे, माडगे या फायरमनने पाण्याचा मारा करुन व वेळीच उपाय करुन इथेनॉल केमिकलची गळती थांबवण्याचा कसोशीने प्रयत्न केला. व त्यामुळे परिसरात होणारा मोठा अनर्थ टळला.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post