आता राजकारणातील ‘रामनामा’चा जप थांबेल : काँग्रेस


वेब टीम : दिल्ली
अयोध्येतील वादग्रस्त जागेवरून सुरू असलेल्या वादावर सर्वोच्च न्यायालयाने आज अखेर निकाल दिला. केंद्र सरकारने वादग्रस्त जागेवर राम मंदिर बांधण्यासाठी ट्रस्ट स्थापन करावा.

तसेच मशिदीसाठी अयोध्येत मोक्याच्या ठिकाणी पाच एकर जागा देण्यात येईल, असा निर्णय दिला. न्यायालयाच्या या निर्णयाचे काँग्रेसने स्वागत करत,‘कोर्टाच्या निकालानंतर आता राजकारणासाठी रामाच्या नावाचा वापर थांबेल’ असा टोला भाजपला लगावला.

काँग्रेस नेते रणदीप सुरजेवाला यांनी अयोध्या निकालानंतर पक्षाची भूमिका स्पष्ट केली. यावेळी सामाजिक सौहार्दता कायम ठेवण्याचे आवाहन करत काँग्रेसने भाजपवर टीका केली.

काँग्रेसचे प्रवक्ते सुरजेवाला म्हणाले,“सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय आला आहे.आम्ही राम मंदिर बांधण्याच्या बाजूने आहोत. या निर्णयाने फक्त राम मंदिर उभारणीचे दरवाजे खुले झाले नाहीत, तर राम मंदिराच्या मुद्यावरून राजकारण करण्याचे दरवाजे बंद झाले आहेत.”

प्रत्येक भारतीयांचे हे कर्तव्य आहे की, देशातील बंधुभाव , एकता आणि सौहार्दाची भावना कायम ठेवावी.सर्व धर्म समभाव हा आपल्या देशाचा स्थायी भाव आहे.

देशाची परंपरा आणि संस्कृतीचे जतन करणे, एकमेकांच्या धर्माचा आदर करणे आमची सर्वांची जबाबदारी असल्याचे सुरजेवाला म्हणाले.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post