पोलीस - दरोडेखोरांमध्ये तुफान धुमश्चक्री; चौघांना पकडले


वेब टीम : अहमदनगर
घातक शस्त्रासह दरोडा टाकण्याच्या उद्देशाने दबा धरुन बसलेल्या टोळीवर कारवाई करण्यासाठी गेलेल्या पोलिस पथकावर या दरोडेखोरांच्या टोळीने तुफान दगडफेक व विटांचा मारा करत पळून जाण्याचा प्रयत्न केला.

परंतु त्यातील चौघा अट्टल दरोडेखोरांना पोलिसांनी पाठलाग करुन अटक केली आहे. या टोळीतील दोघे मात्र पसार झाले आहेत.

ही कारवाई सोमवारी (दि.25) पहाटेच्या सुमारास राहुरी शहरातील गोकुळकॉलनी परिसरात घडली.

सशस्त्र दरोडेखोरांच्या टोळीची माहिती पोलिसांना पहाटे सव्वातीनच्या सुमारास मिळाली. त्यानंतर पोलिस पथक तेथे गेले.

पोलिसांना पाहताच दरोडेखोरांनी पोलिसांवर विटांच्या तुकड्यांचा मारा केला व या धमुश्‍चक्रीचा फायदा घेत पलायन केले.

पोलिसांनी त्यांचा पाठलाग करून, शहरात विविध ठिकाणी चार अट्टल दरोडेखोरांना पोलिसांनी अटक केली. सकाळी सात वाजेपर्यंत ही धरपकड सुरू होती.

दरोड्याचे साहित्य, दोन दुचाकीसह एक लाख 42 हजारांचा मुद्देमाल पोलिसांनी ताब्यात घेतला. एका चारचाकी वाहनातून दोन जण पसार झाले.

सागर गोरख मांजरे (वय 22, रा. पाईपलाईन रस्ता, यशोदानगर जवळ, नगर), अविनाश अजित नागपुरे (वय 20, रा.भिंगार, ता. नगर), काशिनाथ मारुती पवार (वय 37, रा. बजरंगवाडी, ता. संगमनेर), गणेश मारुती गायकवाड (वय 24, रा. उक्कलगाव, ता. श्रीरामपूर) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. पसार दोन आरोपींची नावे अद्याप समजलेली नाहीत.

आरोपींकडून गॅस कटर, एक कमर्शियल एलपीजी सिलेंडर, एक ऑक्सिखजन गॅस सिलेंडर, एक तलवार, टॉमी, लोखंडी कटावणी, लोखंडी कात्री, लोखंडी गज, लोखंडी पोखर, लोखंडी सुरा, एक आगपेटी, चार मोबाईल, दोन दुचाकी असे साहित्य पोलिसांनी जप्त केले.

याप्रकरणी राहुरी पोलिसांनी या दरोडेखोरांविरोधात भा.दं.वि. कलम 399, 402 प्रमाणे गुन्ह्याची नोंद केली आहे.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post