रस्त्यावर कचरा फेकून केली घाण; पोलिसांनी केली कारवाई


वेब टीम : अहमदनगर
रस्त्यावर कचरा न टाकण्याबाबत नोटीसा देऊनही नोटीसीचा भंग करुन रस्त्यावर कचरा टाकणार्‍या टपरीचालकांवर कोतवाली पोलिसांनी बुधवार (दि.20) दुपारी 12.30 वा. औरंगाबाद रोडवर कारवाई केली.

याबाबत अधिक माहिती अशी की, कोतवाली पोलिस स्टेशन हद्दीतील दुकानदार व टपरीचालकांना रस्त्यावर केर-कचरा टाकू नये अशी फौजदारी प्रक्रिया संहित कलम 49 प्रमाणे नोटीसा दिल्या होत्या. सदर नोटीसीचा भंग केल्याचे आढळून आल्यास योग्य ती कारवाई करण्याच्या सुचना दिल्या होत्या.

भंग करणार्‍या दुकानदार व टपरीचालकांविरुद्ध कारवाई करण्याच्या सुचना पोलिस निरीक्षक विकास वाघ यांनी दिले आहे. यावरुन कोतवाली पोलिस ठाण्याचे पोलिस नाईक गोरख काळे, आण्णा बर्डे, घुले व संदीप थोरात यांच्या पथकाने कोतवाली हद्दीत फिरून पाहणी केली असता औरंगाबाद रोडवरील महालक्ष्मी चहा विक्री या टपरीजवळ अस्वच्छ पाणी, उरलेले खाद्यपदार्थ व पॉलेथीनच्या पिशव्या टाकल्याचे आढळून आले.

पोलिसांनी टपरीचालकास नाव-गाव विचारले असता त्याचे नाव विलास सखाहरी त्रिभुवन (वय 59, रा.आंबेडकरनगर, माळीवाडा) असे सांगितले. पोलिसांनी अधिक चौकशी केली असता टपरीचालकास यापुर्वी नोटीस दिल्याची माहिती मिळाली.

यावरुन सार्वजनिक ठिकाणी केरकचरा करुन नोटीसीचे उल्लंघन केल्याप्रकरणी भादविक 188 सह महाराष्ट्र पोलिस कायदा कलम 115/117 प्रमाणे गुन्ह्याची नोंद केली असून अधिक तपास पोलिस नाईक योगेश खामकर हे करीत आहेत.

दुसर्‍या कारवाईत पथकास औरंगाबाद रोडवर अन्य एका चहाविक्री टपरीचालकाने त्याच्या दुकानासमोर अस्वच्छ पाणी, उरलेले खाद्यपदार्थ व पॉलेथीनच्या पिशव्या टाकल्याचे आढळून आले.

त्याचे नाव-गाव विचारले असता त्याने त्याचे नाव सुधीर मुरलीधर जगधने (वय 38, आंबेडकरनगर, माळीवाडा) असे सांगितले. या टपरीचालकासही यापुर्वी नोटीस दिली असल्याने निदर्शनास आले.

यावरुन सार्वजनिक ठिकाणी केरकचरा करुन नोटीसीचे उल्लंघन केल्याप्रकरणी भादविक 188 सह महाराष्ट्र पोलिस कायदा कलम 115/117 प्रमाणे गुन्ह्याची नोंद केली असून अधिक तपास पोलिस नाईक योगेश चव्हाण हे करीत आहेत.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post