नगरमध्ये कांद्याचे लिलाव एकत्रितपणे करण्याची मागणी


वेब टीम : अहमदनगर
नगर बाजार समितीतील कांद्याचे लिलाव पारदर्शी होण्यासाठी नेवासा तालुक्यातील घोडेगाव बाजार समितीप्रमाणे एकाच वेळी सर्व व्यापार्‍यांच्या उपस्थितीत लिलाव करावे,’ अशी मागणी नगर तालुका शिवसेनेच्यावतीने समितीचे सभापती विलासराव शिंदे यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.

जिल्हा परिषद सदस्य संदेश कार्ले, शरद झोडगे, युवानेते प्रवीण कोकाटे, पंचायत समितीचे सदस्य व्ही. डी. काळे, गुलाब शिंदे, संदीप गुंड, शिवसेना तालुकाप्रमुख राजू भगत, जिवाजी लगड, अमोल कदम, प्रकाश कुलट यांच्यासह शेतकर्‍यांनी हे निवेदन दिले.

संदेश कार्ले म्हणाले की, ’बाजार समितीच्या माध्यमातून होणार्‍या लिलावाबाबत सुधारणा होणे आवश्यक आहे. एकाच वेळी अनेक ठिकाणी लिलाव सुरू असतात. त्यामुळे एकाच दिवशी एकसारख्या मालाला कमी-अधिक दर मिळतो. याचा मोठा आर्थिक फटका शेतकर्‍यांना बसतो.

घोडेगाव बाजार समितीत एकावेळी एका ठिकाणी सर्व व्यापारी उपस्थित राहून कांद्याचा लिलाव करतात. त्यामुळे कांद्याचे भाव कमी होणार नाहीत. कांद्याला कमी दर मिळाल्यामुळे व्यापारी व शेतकर्‍यांमध्ये गैरसमज होऊन वारंवार आंदोलने होतात.

त्यासाठी शेतकरी, व्यापारी व बाजार समिती यांच्या एकत्रित विचाराने कांद्याचे लिलाव करावेत. याबाबत बाजार समितीने आठवडाभरात अंमलबजावणी करावी अन्यथा तीव्र स्वरूपाचे आंदोलन करण्याचा इशारा कार्ले यांनी दिला आहे.

याबाबत सभापती विलास शिंदे यांनी सांगितले, संचालक मंडळाने घोडेगाव बाजार समितीच्या लिलाव पद्धतीची माहिती घेऊन बाबतच्या अंमलबजावणीसाठी बैठकही घेतली आहे.

मापाडी तसेच त्यासाठी आवश्यक कर्मचार्‍यांना तशाप्रकारचे प्रशिक्षण देण्याचे कामही सुरू आहे. नगर बाजार समितीतही घोडेगाव बाजार समितीप्रमाणे लवकरच कांद्याचे लिलाव केले जाणार आहेत, असे शिंदे यांनी सांगितले.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post