विश्वविक्रम करत मनु भाकरने पटकावले सुवर्णपदक


वेब टीम : दिल्ली
भारताची आघाडीची नेमबाज मनू भाकर हिने शूटिंग वर्ल्ड कप फायनल्समध्ये (ISSF) महिलांच्या १० मीटर एअर पिस्तूल गटात सुवर्ण पदक पटकावले आहे.

यावेळी तिने २४४.७ गुण मिळवत ज्युनिअर विश्व विक्रमाची नोंदही केली. याच स्पर्धेत बुधवारी २५ मीटर एअर पिस्तूल गटात मनू फायनलसाठी पात्र ठरण्यात अपयशी झाली होती मात्र गुरुवारी तिने जबरदस्त पुनरागमन केले.

वयाच्या अवघ्या १७ व्या वर्षी तिने ज्युनिअर विश्वविक्रम आपल्या नावावर नोंदवला आहे. आयएसएसएफ वर्ल्ड कपमध्ये महिलांच्या १० मीटर एअर पिस्तुल स्पर्धेत सुवर्ण पदक पटकावणारी ती दुसरी भारतीय नेमबाज ठरली आहे.

या आधी हिना सिद्धूने हा पराक्रम केला होता. मनू व तिची सहकारी यशस्विनीने पुढील वर्षी टोकिओ ऑलिम्पिकसाठी १० मीटर एअर पिस्तुल स्पर्धेत कोटा मिळवला आहे. त्यामुळे त्यांच्याकडून पदकाच्या आशा उंचावल्या आहेत.

मनूने २४४.७ गुण मिळवत बाजी मारली. तर सर्बियाच्या जोराना अरुनोविकने २४१.९ गुणांसह रौप्य आणि चीनच्या क्वियान वांगने २२१.८ गुणांसह कांस्य पदक पटकावले.

भारताची यशस्विनी सिंह देसवाल १५८.८ गुणांसह आठव्या स्थानावर राहिली. पुरुषांच्या १० मीटर एअर पिस्तुल गटात अभिषेक वर्मा आणि सौरभ चौधरी या दोघांनी फायनलमध्ये धडक मारली आहे.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post