शिवसेनेची आता दिल्लीवर स्वारी : संजय राऊत यांनी केले मोठं विधान


वेब टीम : मुंबई
मंत्रालयाच्या सहाव्या मजल्यावर शिवसेनेचं सूर्ययान उतरेल असं मी म्हणालो होतो. तेव्हा लोक माझी चेष्टा करत होते.

आता आमचं सूर्ययान सुरक्षितरित्या मंत्रालयाच्या सहाव्या मजल्यावर उतरलं आहे. ते दिल्लीतही उतरलं तर आश्चर्य वाटायला नको,’ असं सूचक विधान शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी केलं आहे.

गेला महिनाभर सुरु असलेल्या सत्तासंघर्षात संजय राऊत यांनी नेटाने शिवसेनेची भूमिका मांडली.

शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदी विराजमान होणार हे नक्की झाल्यावर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला.

संजय, आता दिल्लीत जायचंय..
‘आमचा पक्ष आणि आम्ही काय करतोय हे आम्हाला पक्कं माहीत होतं. महाराष्ट्रात आता महाविकास आघाडीचं सरकार येतंय. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांचे लवकरच शपथविधी होतील.

त्यानंतर महाराष्ट्राच्या प्रश्नांवर ते बोलतील. माझं मिशन पूर्ण झालेलं आहे. आता मी कमी बोलणार आहे,’ असं त्यांनी सांगितलं.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी ‘संजय, आता आपलं काम संपलं आहे. आपल्याला दिल्लीत जायचंय’ असं आपल्याला सांगितल्याचंही राऊत म्हणाले.

महाराष्ट्र कोणापुढे झुकणार नाही
‘महाराष्ट्र प्रगत राज्य आहे. इथल्या जनतेत भाजपविषयी रोष आहे. महाराष्ट्राच्या मातीत पुण्य शिल्लक आहे म्हणूनच राज्यात शिवसेनेचा मुख्यमंत्री बसणार आहे. देशाच्या परिवर्तनाची सुरूवात महाराष्ट्रातून झाली आहे. शिवसनेनेच्या हाती राज्याची कमान जाऊ नये म्हणून भाजपकडून अनेक अघोरी प्रयत्न करण्यात आले. परंतु हा छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र आहे. तो कधीही तुटणार नाही आणि दिल्लीच्या तख्तापुढे झुकणार नाही,’ असा विश्वासही राऊत यांनी व्यक्त केला.

मी काही चाणक्य नाही
मी काही चाणक्य वगैरे नाही. चाणक्य ही खूप मोठी व्यक्ती होती. आम्ही परिणामांची पर्वा न करता लढणारे शिवसैनिक आहोत, अशी प्रतिक्रिया त्यांनी आपण शिवसेनेचे चाणक्य आहात का या प्रश्नावर बोलताना दिली.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post