खोटं बोलायला मी भाजपवाला नाही; उद्धव ठाकरेंचा फडणवीस, शहांवर हल्लाबोल


वेब टीम : मुंबई
महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षात वार प्रतिवार सुरुच आहेत. देवेंद्र फडणवीस यांच्या पत्रकार परिषदेनंतर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी माध्यमांशी संवाद साधताना फडणवीस आणि भाजपवर जोरदार हल्लाबोल केला.

उद्धव म्हणाले, शिवसेनेवर पहिल्यांदाच खोटारडेपणाचा आरोप झाला आहे. अमित शहा मातोश्रीवर आले होते तेव्हाच त्यांच्यासोबत मुख्यमंत्रिपदाबाबत चर्चा झाली होती.

 त्यानंतरच युती झाली. देवेंद्र फडणवीसांनी माझ्यावर, ठाकरे कुटुंबीयावर खोटेपणाचा आरोप केला याचं दुःख वाटलं. अमित शहांच्या नावाचा वापर करुन काळजीवाहू मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस खोटं बोलले आहेत.

सत्तेची खुर्ची माणसाला किती वेडं करते हे मी पाहिलं. देवेेंद्र फडणवीस यांच्याकडून ही अपेक्षा नव्हती.

काळजीवाहू मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची पत्रकार परिषद मी पाहिली; ती पाहून मला आनंदही वाटला आणि दुःखही वाटलं. अनेक विकासकामांचा पाढा त्यांनी वाचला. शिवसेना सोबत होती की नाही? असा उल्लेखही त्यांनी केला.

आम्ही सोबत नसतो तर ही विकासकामं तुम्ही करु शकला असता का? पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांच्याविरोधात मी काहीही बोललो नाही. मोदी आणि शहांवर तसेच त्यांनी घेतलेल्या निर्णयांवर तिखट टीका करणाऱ्या नेत्यांसोबत भाजप मांडीला मांडी लावून सत्तेत बसतं.

उदयनराजेंनी मोदींना पगडी घातली तेच उदयनराजे मोंदीविषयी काय बोलले होते हे भाजप विसरली का?

मला खोटं ठरवणाऱ्या देवेंद्र फडणवीस यांच्याशी मी बोलणार नाही. माझ्यावर खोटेपणाचा आरोप केला ते दुर्दैवी आहे. काळजीवाहूंनी असा काही प्रयत्न करु नये. खोटं बोलायला मी भाजपवाला नाही.

भाजपने खोटं बोलू नये, अच्छे दिन आणि नोटबंदीवेळी कोण खोटं बोललं हे सगळ्या देशाने पाहिलं आहे. मी तुमची अडचण समजून मी १२४ जागा मान्य केल्या, हा माझा गुन्हा आहे का?

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दोनवेळा माझा उल्लेख लहान भाऊ असा केला होता. आता त्यामुळे कुणाला पोटशूळ उठला असेल तर त्यावर काय बोलणार? भाजपशी शत्रुत्त्व नाही मात्र त्यांनी खोटं बोलू नये.

शब्द द्यायचा आणि वेळ मारुन फिरवायचा हे भाजपचं धोरण आहे आमचं नाही. गंगा साफ करता करता यांची मनं कलुषित झाली. राम मंदिराबाबत निर्णय न्यायालय घेणार आहे, केंद्र सरकारचा यात काडीचाही संबंध नाही, हेही लक्षात घ्यावं. सत्तेची लालसा असलेल्या लोकांसोबत राहिलो याचं वाईट वाटतं.

काळजीवाहू मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज विश्वासाने सांगत आहेत की भाजपचंच सरकार येणार. संख्याबळ नसताना ते कोणत्या विश्वासावर ही बाब मांडत आहेत?

मी बाळासाहेबांना वचन दिलं होतं की शिवसेनेचा मुख्यमंत्री सभागृहात बसेल. ते वचन पूर्ण करण्यासाठी मला अमित शहा आणि आणि फडणवीस यांची गरज नाही.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post