विखे कारखान्याबाबत न्यायालयाच्या निकालाचा विपर्यास; निकाल कारखान्याच्या बाजूने असल्याचा दावा


वेब टीम : लोणी
पद्मश्री डॉ.विठ्ठलराव विखे पाटील सहकारी साखर कारखान्‍याच्‍या कर्जमाफी प्रकरणाच्‍या याचिकेवर सर्वोच्‍च न्‍यायालयाने कारखान्‍याच्‍या बाजुने निकाल दिला आहे. कारखान्‍यावर कोणतेही ताशेरे ओढले नसतानाही, निकालाचा विपर्यास करुन काही माध्‍यमांमध्‍ये कारखान्‍याची व मंत्री राधाकृष्‍ण विखे पाटील यांची बदनामी करण्‍याचा प्रयत्‍न झाला. या विरोधात कारखान्‍याच्‍या वतीने सर्वोच्‍च न्‍यायालयात अवमान याचीका दाखल करण्‍यात येणार आहे अशी माहीती कारखान्‍याचे कार्यकारी संचालक ठकाजी ढोणे यांनी दिली.

या संदर्भात प्रसिध्‍दीस दिलेल्‍या पत्रकात कारखान्‍याच्‍या वतीने स्‍पष्‍ट करण्‍यात आले आहे की, पद्मश्री डॉ.विठ्ठलराव विखे पाटील साखर कारखान्‍याने सर्वोच्‍च न्‍यायालयात मा.औरंगाबाद खंडपिठाच्‍या आदेशावर दाखल केलेल्‍या याचिकेची सुनावणी झाली. कारखान्‍याने दाखल केलेली याचिका स्विकारत सुनावणी दरम्‍यान कारखान्‍यातर्फे करण्‍यात आलेल्‍या युक्‍तीवादात, उच्‍च न्‍यायालय तपासी आधिका-याला गुन्‍हा नोंदविण्‍याचे कायद्याने निर्देश देवू शकत नाही.

सदरचा युक्‍तीवाद सर्वोच्‍च न्‍यायालयाने ग्राह्य धरुन प्रतिवादी महाराष्‍ट्र शासन यांना नोटीस जारी केली आहे व उच्‍च न्‍यायालयाच्‍या आदेशास अंतरिम स्‍थगीती देण्‍याबाबत पुढील सुनावणी ३ आठवड्यानंतर ठेवण्‍यात आली आहे. तसेच सर्वोच्‍च न्‍यायालयाने आपल्‍या आदेशात पुढे असेही म्‍हटले आहे की, तपासी आधिकारी यांनी तपास चालु ठेवून उपलब्‍ध झालेल्‍या पुराव्‍यांच्‍या आधारे गुन्‍हा दाखल करावयाचा किंवा प्रकरण बंद करावयाचे याबाबतचा निर्णय तपासी आधिकारी यांनी घ्‍यावा असे निर्देशीत केले आहे.

सदर प्रकरणी असे निदर्शनास आले आहे की, सर्वोच्‍च न्‍यायालाच्‍या आदेशाची प्रत मिळण्‍याआगोदरच काही माध्यमांमध्ये दिशाभुल करणारे वृत्‍त प्रसारित केले हेच यावरुन सिध्‍द होते. वास्‍तविक न्‍यायालयाच्‍या आदेशाची चुकीची प्रसिध्‍दी करणे ही बाब म्‍हणजे सर्वोच्‍च न्‍यायालयाचा अवमान आहे. त्‍याबाबत कारखान्‍याने योग्‍य ती कायदेशिर कारवाई करण्‍याचा निर्णय घेतला असल्‍याचे कार्यकारी संचालक ढोणे यांनी स्‍पष्‍ट केले आहे.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post