खुशखबर : अहमदनगर - पुणे इंटरसिटी रेल्वे होणार सुरु


वेब टीम : अहमदनगर
'नगर-पुणे इंटरसिटी रेल्वे सुरू करण्यासाठी तांत्रिक पूर्तता करण्याचे काम सुरू आहे. येत्या सहा महिन्यांच्या आत ही सेवा सुरू केली जाईल,’ अशी माहिती सोलापूर विभागीय रेल्वे अधिकारी शैलेश गुप्ता यांनी दिली.

विभागीय रेल्वे सल्लागार समितीची बैठक सोलापूर येथे झाली. त्यामध्ये विभागीय सल्लागार समितीतील नगरचे सदस्य हरजितसिंग वधवा यांनी मांडलेल्या सूचनांना उत्तरे देताना गुप्ता यांनी ही माहिती दिली.

गुप्ता यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक झाली. अतिरिक्त विभागीय रेल्वे अधिकारी व्ही. के. नागर, वरिष्ठ विभागीय वाणिज्य अधिकारी प्रदीप हिरदे यांच्यासह ठिकठिकाणांहून आलेले समितीचे सदस्य उपस्थित होते.

वधवा यांनी नगरशी संबंधित मुद्दे उपस्थित केले. त्यात नगर-पुणे इंटरसिटी रेल्वेचा समावेश होता. यावर उत्तर देताना गुप्ता यांनी सांगितले की, ’नगर-पुणे थेट रेल्वेसाठी आवश्यक असलेली कॉडलाइन टाकून झाली आहे. मात्र, स्थानक आणि अन्य सुविधा बाकी आहेत. दौंड येथे त्या सुविधा उपलब्ध झाल्या की ही इंटरसिटी सेवा सुरू केली जाणार आहे.’

बैठकीत नगर जिल्ह्याशी संबंधित अन्य प्रश्नांवर चर्चा झाली. नगरहून जाणार्‍या सर्व पॅसेंजर गाड्या पूर्ववत सुरू कराव्यात, मॅगा ब्लॉकच्या नावाखाली बंद केलेल्या महत्त्वाच्या पॅसेंजर रेल्वे गाड्या पुन्हा सुरू कराव्यात.

नगर-बीड-परळी रेल्वेच्या कामाला गती देण्यात यावी, नगरच्या रेल्वे स्टेशनजवळील उड्डाणपुलाला तडे गेले असून त्याची दुरूस्ती करावी, स्टेशनवरील अवैध अनधिकृत विक्रेत्यांवर कारवाई करावी, पाणीपट्टी थकल्याने महापालिकेने रेल्वे स्टेशनचे पाणी बंद केले आहे, ते पुन्हा सुरू करण्यासाठी प्रयत्न करावेत, अशा मागण्या करण्यात आल्या.

याला उत्तरे देताना गुप्ता यांनी सांगितले की, नगर-पुणे महामार्गावरील रेल्वे उड्डाणपूल सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अखत्यारीत येतो. त्याची पाहणी करून त्या विभागाला कळविण्यात येईल. पाणीपट्टीची थकबाकीसंबंधी चर्चा झाली असून, लवकरच हा प्रश्न सुटणार आहे.

दौंड-मनमाड मार्गाच्या दुहेरीकरणाचे काम सुरू असल्याने मॅगाब्लॉक घेण्यात येत असल्याने पॅसेंजर गाड्या बंद आहेत. हे काम प्रगतीपथावर असून ते पूर्ण झाले की सर्व गाड्या पुन्हा सुरू होतील.’ या वेळी नगरचे वाणीज्य अधिकारी आर. एस. मीना यांच्यासह अन्य अधिकारी व सदस्य उपस्थित होते.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post