अर्धवट जळालेला मृतदेह मोकाट कुत्र्यांनी चितेतून काढला बाहेर


वेब टीम : अहमदनगर
अर्धवट जळालेला मृतदेह मोकाट कुत्र्यांनी चितेतून बाहेर काढत बर्‍याच अंतरावर ओढत नेल्याचा धक्कादायक प्रकार नालेगाव येथील अमरधाम स्मशानभूमीत सोमवारी (दि.2) सकाळी उघडकीस आला.

त्यामुळे एकच खळबळ उडाली. परिसरातील काही तरुणांनी पुन्हा या अर्धवट जळालेला मृतदेहाचा दहनविधी केला.

अमरधाम स्मशानभूमीत रविवारी (दि.1) दिवसभरात सुमारे 13 ते 14 अंत्यविधी झाले. दहन ओट्यांची संख्या कमी असल्याने काही अंत्यविधी ओट्याच्या खाली करण्यात आले होते. रात्री उशिरा ही एक अंत्यविधी ओट्याच्या खालीच करण्यात आला होता.

सकाळी काही नागरिक दशक्रिया विधी निमित्त अमरधाममध्ये आले असता त्यांना एक अर्धवट जळालेला मृतदेह मोकाट कुत्रे ओढत नेत असल्याचे दिसून आले. त्यामुळे तेथे उपस्थित नागरिकांमध्ये काही काळ घबराटीचे वातावरण पसरले होते.

अनेकांनी महापालिकेचे अधिकारी कर्मचारी तसेच नगरसेवकांना फोन करुन याबाबतची माहिती दिली. काहींनी पोलिसांनाही कळविले.

याबाबतची माहिती समजताच नवग्रह मित्र मंडळाचे अमोल बनकर व कार्यकर्ते त्या ठिकाणी आले. त्यांनी हा प्रकार पाहिला. सदरचा अर्धवट जळालेला मृतदेह हा भटक्या कुत्र्यांनी चितेतून बाहेर काढल्याचे निदर्शनास आले.

त्यानंतर बनकर व त्यांच्या सहका-यांनी सदर अर्धवट जळालेला मृतदेह पुन्हा चितेवर नेवून पुन्हा विधीवत दहनविधी केला. या घटनेमुळे अमरधाम मधील सुविधा व सुरक्षेचा प्रश्‍न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.

एखाद्या मृतदेहाची विटंबना ही संतापजनक बाब असून अमरधाम स्मशानभूमीची संरक्षक भिंत ठिकठिकाणी ढासळलेली असल्याने मोकाट कुत्रे व जनावरांचा या ठिकाणी नेहमीच वावर असतो. त्यातूनच अशा घटना होत असतात त्यामुळे याचा तातडीने बंदोबस्त करावा, अशी मागणी यावेळी अजय चितळे यांनी केली.

विद्युतदाहिनी तातडीने सुरू करणार : महापौर बाबासाहेब वाकळे
अमरधाम मधील मृतदेहाच्या विटंबनेचा प्रकार समजताच महापौर बाबासाहेब वाकळे यांनी अमरधाममध्ये जावून पाहणी केली. तसेच दुपारी तातडीने विद्युत विभाग, आरोग्य विभाग व उद्यान विभागाची बैठक घेतली. या बैठकीत अमरधाममध्ये करावयाच्या आवश्यक सोयी-सुविधांबाबत मंजूर असलेली 40 लाखांची कामे तातडीने सुरू करण्याचे आदेश त्यांनी दिले. तसेच अमरधाममधील बंद असलेली विद्युत दाहिनी तातडीने सुरू केली जाईल. या विद्युतदाहिनीसाठी पुर्वी 1200 रुपये शुल्क आकारले जात होते. ते आता 900 रुपये आकारण्यात येईल. तसेच बोरा ट्रस्टच्या मार्फत आणखी एक विद्युतदाहिनी बसविली जाणार असून तीही लवकरच कार्यान्वित होईल असेही महापौर वाकळे म्हणाले.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post