वेब टीम : मुंबई मुंबई महापालिकेतील गटनेते मनोज कोटक खासदार झाल्यापासून पालिकेत भाजपला दुसरा आक्रमक चेहरा सापडत नाही. मुंबई महापालिकेच्य...
वेब टीम : मुंबई
मुंबई महापालिकेतील गटनेते मनोज कोटक खासदार झाल्यापासून पालिकेत भाजपला दुसरा आक्रमक चेहरा सापडत नाही. मुंबई महापालिकेच्या राजकारणात भाजपला आक्रमक व्हायचे आहे.
त्यामुळे भाजप आता भालचंद्र शिरसाट किंवा प्रवीण छेडा यांना नगरसेवक म्हणून निवडून आणून त्यांच्या गळ्यात विरोधी पक्षनेत्याची माळ घालण्याचे नियोजन मुंबई भाजपमध्ये सुरू आहे.
गटनेते मनोज कोटक खासदार झाल्यापासून पालिकेत भाजपची विविध विषयांवरची भूमिकाच ठरत नाही आहे. त्यामुळे भाजप नगरसेवकांची समिती बैठकांमध्ये आणि सभागृहामध्येही अपेक्षित विरोधाची धार दिसत नाही आहे.
त्यामुळेच शिवसेनेचा जीव असलेल्या मुंबई महापालिकेतही विविध विषयांवरून घेरण्यासाठी भाजपचे नियोजन आहे. महापालिकेत नगरसेवक असलेले मुलुंडचे मनोज कोटक खासदार झालेत तर घाटकोपरचे पराग शहा आमदार झाले आहेत.
त्यामुळे या दोघांना नगरसेवकपदाचा राजीनामा द्यायला सांगून त्या ठिकाणाहून भालचंद्र शिरसाट किंवा प्रवीण छेडा यांना निवडून आणायचे आणि महापालिकेतील भाजपच्या नेतृत्वाची धुरा यांच्याकडं सोपवायची आहे.
कारण हे दोन्ही प्रभाग भाजपसाठी अत्यंत सुरक्षित समजले जातात. भाजप २०२२ च्या मुंबई महापालिका निवडणुकीचे रणशिंग आतापासूनच फुंकत असले तरी त्यासाठी पालिकेत सत्ताधारी शिवसेनेविरोधात आक्रमक होण्याची गरज आहे. परंतु सध्या याचाच मुळात अभाव दिसून येतो आहे. त्यासाठीच मुंबई भाजपमध्ये वेगळी रणनीती आखली जात आहे.