नागरिकत्व विधेयक : डाव्या पक्षांचे गुरुवारी देशव्यापी आंदोलन

file photo

वेब टीम : अहमदनगर
भाकप, माकप, लाल निशाण पक्ष लेनिनवादी, पीस फौंडेशन अहमदनगर तसेच इतर पुरोगामी, धर्मनिरपेक्ष पक्ष व संघटनांच्यावतीने गुरुवारी (दि.19) सकाळी 10 वा. मार्केटयार्ड समोरील भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यासमोर नागरिकत्व संशोधन विधेयक संमत केल्याच्या निषेधार्थ तीव्र आंदोलन करण्यात येणार असल्याची माहिती अॅड. कॉ. सुभाष लांडे पाटील यांनी दिली.

या आंदोलनासाठी गुरुवारी (दि. 19) सकाळी 10 वा. वाडियापार्कातील राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या पुतळ्यास अभिवादन करून महात्मा ज्योतिबा फुले, छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास अभिवादन करून सर्व कार्यकर्ते मार्केटयार्ड समोरील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला अभिवादन करून या कायद्या विरोधात निदर्शने करणार आहेत.

या आंदोलनात डाव्या पुरोगामी पक्ष व संघटनेतील कार्यकर्ते तसेच या कायद्याला विरोध असणारे सहकारी मित्र व नागरिकांनी सहभागी व्हावे, असे आवाहन कॉ.स्मिता पानसरे, अॅड.कॉ.शांताराम वाळुंज, कॉ.बाबा आरगडे, आर्किटेक्ट अर्शद शेख, प्रा.मेहबूब सय्यद, अॅड. कॉ. बन्सी सातपुते, अॅड. कॉ. सुधीर टोकेकर, कॉ. भैरवनाथ वाकळे, कॉ.राजेंद्र बावके, कॉ.अनंत लोखंडे, कॉ. संतोष खोडदे, कॉ. भारती न्यालपेल्ली, महादेव पालवे, निलिमा बंडेलू, आनंद वायकर यांनी केले आहे.

संसदेच्या दोन्ही सदनांनी नागरिकत्व (संशोधन) विधेयक पारित केले आहे. भारतीय घटनेची पूर्णपणे पायमल्ली करणारे हे विधेयक भारतीय गणतंत्राचे धर्मनिरपेक्ष लोकशाही स्वरूप नष्ट करण्याच्या उद्देशानेच आणले गेले आहे, असे डाव्या पक्षांचे मत आहे. धर्मनिरपेक्षतेच्या पूर्णतः विरोधात जाऊन व्यक्तीचे नागरिकत्व त्याच्या धार्मिक संलग्नतेशी जोडणार्‍या या विधेयकाला डाव्या पक्षांचा तीव्र विरोध आहे.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post