नराधमांना जनतेसमोर ‘फाशी’ द्या; नगरमध्ये महिलांची निदर्शने


वेब टीम : अहमदनगर
हैद्राबाद येथील डॉ. प्रियंका रेड्डी यांच्यावर सामूहिक अत्याचार करणार्‍या नराधमांना जनतेच्या समोर फाशीची शिक्षा द्या, अशी मागणी करत नगरमधील सर्वपक्षीय महिला कार्यकर्त्यांनी मंगळवारी (दि.3) जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जोरदार निदर्शने केली.

अत्याचाराला बळी पडलेल्या महिला डॉक्टरला श्रद्धांजली अर्पण करुन सर्वपक्षीय महिला कार्यकर्त्यांनी या अत्याचाराच्या घटनेचा तीव्र निषेध यावेळी नोंदवला. अत्याचाराच्या घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा होण्यासाठी कायद्यात बदल करावा.

आरोपीला भीती वाटावी यासाठी जनतेसमोरच अशा आरोपींना फाशी द्यावी. शाळेत मुला-मुलींना स्वसंरक्षणाचे धडे द्यावेत. जिजाऊंनी छत्रपती शिवाजी महाराजांना जी शिकवण दिली तशी शिकवण प्रत्येक आई-वडिलांनी आपल्या मुलांना द्यावी अशा मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकारी यांना देण्यात आले.

हैद्राबाद येथील अत्याचाराची घटना ही माणुसकीला काळीमा फासणारी असून आमच्या तीव्र भावना शासनापर्यंत पोहोचवाव्यात अशी मागणी यावेळी करण्यात आली.

या निदर्शने आंदोलनात राष्ट्रवादी काँग्रेसच्या रेश्मा आठरे, भाजपाच्या गितांजली काळे, सुरेखा विद्ये, काँग्रेसच्या सविता मोरे, अॅड. अनुराधा येवले, मनसेच्या अनिता दिघे, शिवसेनेच्या सुवर्णा गेनाप्पा, संध्या मेढे, कुसुम शेलार, लिलाबाई अग्रवाल, रचना काकडे, कुमोदिनी जोशी, कमल शिंदे, सुरेखा कडूस, अपर्णा पालवे, निर्मला जाधव, मुमताज शेख, अजिता एडके, सुनंदा कांबळे, प्रिती संचेती, लता गायकवाड, सुनीता पाचारणे, प्रिया जानवे आदींसह महिला सहभागी झाल्या होत्या.

महिलांवरील अत्याचारात वाढ
डॉ. प्रियंका रेड्डी यांच्यावर सामूहिक अत्याचार झाला व त्यांची निर्घृण हत्या करण्यात आली. ही बाब अतिशय गंभीर, निंदनीय व अमानवीय आहे.

महिलांवर होणारे अत्याचार हे दिवसेंदिवस वाढत आहेत. या घटनेतून असे सिद्ध होत की, महिला सुरक्षित नाही. खैरलांजी, दिल्ली आणि उमरेड, कोपर्डी असे अनेक घटना या आधी घडलेल्या आहेत आणि अशा घटना रोखण्यासाठी पुन्हा एकदा अपयशी ठरलो आहोत.

असे प्रकार घडल्यानंतर नुसत्या मेणबत्या जाळून व श्रद्धांजली वाहून या घटना थांबलेल्या नाहीत त्यासाठी ठोस उपाययोजना व त्वरित कायद्याची कठोर अंमलबजावणी जर झाली तर अशा घटनांना पायबंद बसेल व समाजामध्ये असे नराधम जे उजळमाथ्याने फिरतात त्यांना सुद्धा जरब बसली पाहिजे.

ज्या देशात महिलांना देवी मानतात, बेटी बचाओ, बेटी पढाओ असे नारे देतो आणि त्याच देशातील माता व भगिनींच्या इज्जतीचे धिंडवडे निघत आहेत. महाराष्ट्रासारख्या पुरोगामी राज्यात महिलांवरील अत्याचारांनी परिसिमा गाठली आहे.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post